

रेणुका शहाणे यांच्या अभिनय कारकिर्दीला २९ वर्षांनंतर फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, ‘अबोली’पासून ओटीटीपर्यंतचा त्यांचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाचा गौरव मानला जात आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुका शहाणे यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा सन्मान त्यांना तब्बल २९ वर्षांनंतर मिळाला असून, त्यामुळे हा क्षण त्यांच्या चाहत्यांसाठीही भावनिक ठरला. ‘अबोली’ या गाजलेल्या भूमिकेपासून ते ओटीटीवरील दमदार अभिनयापर्यंतचा त्यांचा प्रवास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
रेणुका शहाणे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शन आणि मराठी चित्रपटांमधून केली. ‘अबोली’ या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. हम आपके हैं कौनसारख्या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. तर टीव्हीवरील सुरभि शोमधून त्या घराघरात पोहोचल्या.
मराठी चित्रपट अबोलीसाठी त्यांना १९९५ मध्ये पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता २९ वर्षांनंतर, त्यांना धावपट्टीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि दुपहिया या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
१९९५ मध्ये अबोलीसाठी मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार हा मराठी चित्रपटासाठी मिळालेला माझा पहिला पुरस्कार होता. त्या काळात मराठी सिनेमा अजून विकसित होत होता आणि फिल्मफेअर जिंकणे म्हणजे माझ्या प्रवासाची एक उज्ज्वल सुरुवात होती. २९ वर्षांनंतर दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळणे हे शांत, पण अत्यंत प्रभावी घरवापसीसारखे वाटते, जे प्रगती, सातत्य आणि कलेवरील प्रेमाचे प्रतिबिंब आहे.
- रेणुका शहाणे, अभिनेत्री
काळ बदलला, माध्यमे बदलली; मात्र रेणुका शहाणे यांचा अभिनयातील सातत्य आणि सौंदर्यही तितकचं कायम राहिलं आहेत. अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. कोणतीही व्यक्तिरेखा असो ते साकारण्यात त्या आजही तितक्याच प्रभावी आहेत, हे त्यांनी सिद्ध केले आहे.