पुढारी ऑनलाईन डेस्क - स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. 'रीलस्टार' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रीलस्टार' या मल्टीस्टारर चित्रपटाचे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Reelstar Movie)
'रीलस्टार'ची निर्मिती जोस अब्राहम, मोनिका कंबाती आणि निशील कंबाती यांनी जे फाइव्ह एंटरटेनमेंट्स, फोनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. 'अन्य' फेम सिम्मी आणि रॉबिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुधीर कुलकर्णी आणि रॉबिन यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. पोस्टरवरील वेगवेगळ्या गेटअपमधील कलाकारांचे चेहरे लक्ष वेधून घेतात. यासोबतच 'रीलस्टार'मध्ये काहीतरी भन्नाट आणि अनोखे पाहायला मिळणार असल्याची चाहूलही देतात. समाजात वावरताना कुठेही एखादी घटना घडली किंवा आनंदाचा क्षण दिसला की तो कॅमेऱ्यात कैद करून सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम रीलस्टार करत असतात. या चित्रपटामध्ये अशाच अनोख्या रीलस्टारची रोमांचक कहाणी पाहायला मिळणार आहे.
रिलीज झालेल्या नवीन मोशन पोस्टरबद्दल, दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन म्हणाले, रीलस्टार ही प्रत्येक सामान्य माणसाची कथा आहे ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या वाईटाला सामोरे जावे लागते आणि म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'रीलस्टार'चा फर्स्ट लुक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. प्रसाद ओकसारख्या अतिशय लोकप्रिय अभिनेत्याच्या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आल्याने, मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षाही रीलस्टारबद्दल शिगेला पोहोचल्या आहेत. धर्मवीर-२ नंतर रीलस्टार हा प्रसाद ओक यांचा पुढचा चित्रपट असेल. निर्माता जोस अब्राहम म्हणाले की हा चित्रपट जानेवारीमध्ये पडद्यावर येईल.
प्रसाद ओक आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण मंजुळे 'रीलस्टार'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच या चित्रपटात मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, करीश्मा देसले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.
बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमॅटोग्राफी डीओपी शिनूब टीसी यांनी केली आहे. गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिली आहेत, तर दृश्यम सारख्या सुपरहिट साऊथ चित्रपटांना संगीत देण्यासाठी प्रसिद्ध असलेले विनू थॉमस यांनी संगीत दिले आहे. डीजो यांनी संकलन केले आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी, तर राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे हे कास्टिंग डायरेक्टर आणि रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत.