

पुढारी ऑनलाईन डेस्क : कन्नड अभिनेत्री रान्या राव १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, तिने आरोप केला आहे की, कोठडीत असताना तिला त्रास दिला गेला. अधिकाऱ्यांनी तिच्यावर साध्या कागदांवर सह्या करण्यास सांगितले. थप्पड लगावले..असे अनेक गंभीर आरोप तिने केले आहेत. दरम्यान, तिने स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
कन्नड अभिनेत्री रान्या रावला सोने तस्करी प्रकरणी बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. दुबईहून १४.८ किलो सोने आणल्याच्या आरोपाखाली महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रान्या राव न्यायालयीन कोठडीत आहे. आता तिने आरोप केले आहेत की, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला अनेकवेळी थप्पड मारले, जेवण दिले नाही. आणि तिला साध्या कागदावर सह्या करण्यास सांगितले. अतिरिक्त महासंचालक यांना लिहिलेल्या पत्रात रान्या रावने लिहिलं की, ती निर्दोष आहे. तिला चुकीच्या केसमध्ये अडकवले जात आहे.
रान्याच्या माहितीनुसार, अनेकवेळा सांगितल्यानंतरही तिने साध्या कागदावर सह्या केल्या नाहीत. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिच्यासमोर ५०-६० टाईप केलेले कागद ठेवले आणि त्यावर सह्या करायला सांगितलं. त्याशिवाय ४० साध्या कागदांवर सह्या करण्यासाठी दबाव आणला.
रान्या म्हणाली, 'माझ्या अटकेपासून ते मला न्यायालयात हजर करण्यापर्यंत मला मारहाण करण्यात आली. त्या अधिकाऱ्यांनी मी ओळखू शकते, ज्यांनी मला १०-१५ वेळा थप्पड मारले. वारंवार त्रास दिल्यानंतरदेखील मी त्यांच्या कागदांवर सह्या केल्या नाहीत.'
याआधी डीआरआयला दिलेल्या आपल्या पहिल्या जबाबात रान्याने कबूल केलं की, तिच्याकडून १७ सोन्याचे तुकडे मिळाले होते. तिने केवळ दुबईच नव्हे तर युरोप, अमेरिका, मध्य पूर्व देशांचा प्रवास केला. यानंतर तिने काहीही सांगण्यास नकार दिला.
कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी (दि. ३ मार्च) रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. माणिक्य आणि पत्की सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी रान्या ही पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. तिच्यावर १४.८ किलो सोने तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.