

Ranveer Singh Kantara Controversy Apology Explained:
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आहे. गोव्यात पार पडलेल्या IFFI 2025 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीरने ‘कांतारा: चॅप्टर 1’मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची स्तुती करताना, चित्रपटातील देवीच्या रूपाचा उल्लेख चुकून ‘महिला भूत’ असा केला. यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला आणि धार्मिक भावना दुखावल्याचा रणवीरवर आरोप करण्यात आला.
वाद वाढताच रणवीरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जाहीर करत स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “माझा हेतू फक्त ऋषभ शेट्टी यांच्या परफॉर्मन्सवर प्रकाश टाकण्याचा होता. माझ्या मनात त्यांच्या प्रती प्रचंड आदर आहे. मी नेहमीच भारतातील सर्व संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांचा सन्मान केला आहे. जर माझ्या बोलण्याने कोणाचेही मन दुखावले असेल, तर मी मनापासून माफी मागतो.”
IFFI च्या कार्यक्रमात रणवीर स्टेजवर होस्टिंग करत होता. रजनीकांत आणि ऋषभ शेट्टी यांना पाहून तो स्टेजच्या खाली गेला. ऋषभसमोर रणवीरने चित्रपटातील ‘चामुंडा’ देवीचा सीन मजेशीर पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ऋषभने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला.
स्टेजवर परत आल्यानंतर रणवीरने प्रथम ऋषभची प्रशंसा केली, आणि नंतर पुन्हा त्या सीनची कॉपी करत म्हणाला “फीमेल घोस्ट तुमच्यात येते तो सीन अप्रतिम होता.” याच वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली.
सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. अनेकांनी देवीच्या अपमानाचा आरोप करत रणवीरवर कारवाईची मागणी केली. शेवटी रणवीरने माफी मागून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.