

Ranapati Shivray Release Date announced
मुंबई - पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील सहावा चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपट निर्मात्यांनी नुकतीच रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यामध्ये काय म्हटलंय पाहुया.
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या निर्मितीतून हा चित्रपट येत आहे. “तुम देखो… तुम्हारा बाप देख्या… तुम्हारा पातशाह देख्या…” या संवादासह निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा करताच सोशल मीडियावर प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान कॉमेंट्स करायला सुरुवात केलीय. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'श्री शिवराज अष्टक' ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक अंतर्गत प्रेक्षकांसमोर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे पाच चित्रपट भेटीला आली. आता सहावे चित्रपुष्प भेटीला येणार आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलंय- ''तुम देखो.. तुम्हारा बाप देख्या.. तुम्हारा पातशाह देख्या..छत्रपती शिवरायांची गर्जना घुमणार..जगभरातील शिवभक्तांच्या आग्रहाचा सन्मान करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण करीत आहोत शिवराज अष्टकातील सहावे शिवपुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा..जगभरातील चित्रपटगृहात 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'..शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात.''
इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय’ - स्वारी आग्रा या चित्रपटातून शिवचरित्रातील ही थरारक घटना प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी , विपुल अगरवाल, जेनील परमार चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते रवींद्र औटी, तन्शा बत्रा आहेत.