

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम गोपाल वर्मा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक समजले जातात. त्यांच्यासोबत काम करणे हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. अशातच त्यांनी कोणत्याही अभिनेत्याच्या कामाची प्रशंसा करणे म्हणजे तर सोन्याहून पिवळेच.अल्लू अर्जुन हा साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. देशभरात त्याचा चाहतावर्ग आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या पुष्पा 2 : द रुल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. आता या चित्रपटाबाबत अनेक समीक्षक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
अलीकडेच 'X' म्हणजे twitter वर राम गोपाल वर्मा यांनी पुष्पा 2 : द रुल या नायकाच्या पुष्पा राजच्या पात्रावर समीक्षण केले आहे. यावेळी त्यांनी समिक्षण करताना चित्रपटाच्या कथेवर लक्ष केंद्रित केले नाही तर अल्लू अर्जुनने साकारलेल्या व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित केले. चित्रपट निर्मात्याने या व्यक्तिरेखेचे कौतुक केले आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी ते कसे लिहिले याबाबत सांगितले.
राम गोपाल वर्मा यांनी समीक्षा करताना लिहिले, "भारतीय सिनेमात असे स्पष्टपणे रेखाटलेले पात्र पाहणे अत्यंत दुर्मिळ आहे." अल्लू अर्जुनने आपले स्टारडम बाजूला ठेवून या व्यक्तिरेखेला पूर्णपणे आत्मसात करून त्यात जिवंतपणा आणला आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “जेव्हा मी पुष्पासारखे पात्र पाहिले तेव्हा मला वाटले की असे पात्र वास्तविक जीवनातही घडू शकते. राम गोपाल वर्मा यांना या व्यक्तिरेखेत निरागसता आणि हुशारी यांचा मिलाफ पाहायला मिळाला. तसेच, या व्यक्तिरेखेत त्यांना अति अहंकारासोबत संवेदनशीलता दिसली. याबाबत राम गोपाल वर्मा लिहीतात की, “विकृत व्यक्ती हा सुपर ॲक्शन हिरो असू शकतो यावर माझा कधीच विश्वास नव्हता, कारण एक सुपर हिरो सैद्धांतिकदृष्ट्या परिपूर्ण असला पाहिजे, परंतु पुष्पाच्या व्यक्तिरेखेतील अल्लू अर्जुनने त्या विकृतीला एक ताकत दिली तसेच मजबूत देहबोली आणि अभिव्यक्ती दिली जी अनेक दशकांपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात राहील.”
राम गोपाल वर्मा यांनी अल्लू अर्जुनच्या अभिनयाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, “अल्लू अर्जुन त्याच्या अभिनयामध्ये ‘ओव्हर द टॉप’ गेला नाही, जो अगदी परिपूर्ण होता. यामुळे काही काल्पनिक दृश्येही खरी वाटू लागली. अल्लू अर्जुनचा अभिनय केवळ त्याच्या देहबोलीपुरता मर्यादित नव्हता तर त्याद्वारे त्याने आपल्या खोल भावना देखील व्यक्त केल्या.
राम गोपाल वर्मा हे त्यांच्या खास शैलीत समीक्षा करण्यासाठी आणि आपले मत परखडपणे व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. पुष्पा 2 : द रुल या चित्रपटाची समीक्षा करतानाही त्यांनी आपल्या खास शैलीत त्याचा समारोप केला आहे. त्यांनी यामध्ये लिहिलंय, “मला माफ करा पण मला सांगायचे आहे की पुष्पाच्या पात्राचा आनंद घेतल्यानंतर मला वाटते की या पात्राच्या तुलनेत खरा अल्लू अर्जुनही कमी पडेल.” एकूणच या चित्रपटातील अभिनयाबद्दल अल्लू अर्जुनचे भरभरून कौतुक राम गोपाल वर्मा यांनी केलंय.