

Rakesh Bedi Inspiring Journey Dhurandhar 2 Success Story: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आयुष्यभर काम करतात, पण खरी ओळख फार उशीरा मिळते. अशीच एक भावूक आणि प्रेरणादायी कथा आहे राकेश बेदी यांची. 49 वर्षांच्या कारकिर्दीनंतर पहिल्यांदाच स्टार असल्याची जाणीव झाली, असं त्यांनी सांगितलं.
‘धुरंधर: द रिवेंज’चा कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्याशी बोलताना राकेश बेदी यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. त्यांनी सांगितलं “मी 49 वर्षं काम केलं, पण आज जसं स्टार असल्यासारखं वाटतंय, तसं कधीच वाटलं नव्हतं.”
राकेश बेदी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील इंजिनिअर होते आणि त्यांना देखील आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावं, अशी अपेक्षा होती. पण राकेश यांचं मन मात्र नाटकात रमलं होतं. IIT च्या प्रवेश परीक्षेला बसल्यावर त्यांनी पेपर पाहिला आणि एक निर्णय घेतला. “आत्ता स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तर कधीच नाही.” ते परीक्षा अर्धवट सोडून बाहेर पडले. आणि आयुष्याची दिशाच बदलली.
FTII मध्ये अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईत आले. सुरुवातीला थिएटर केलं, पण त्यातून फारसे पैसे मिळत नव्हते. जगण्यासाठी त्यांनी साईड रोल्स, कॉमिक कॅरेक्टर्स, शेजारी, मित्र अशा भूमिका केल्या..
150 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी स्वतःला एक “डिपेंडेबल कलाकार” म्हणून सिद्ध केलं. 'यह जो है ज़िंदगी' आणि 'श्रीमान श्रीमती' सारख्या शोमधून त्यांनी लोकांना हसवलं. पण तरीही त्यांना ‘मुख्य कलाकार’ म्हणून ओळख मिळाली नाही.
2019 मध्ये आलेल्या URI: The Surgical Strike ने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवला. दिग्दर्शक आदित्य धर यांनी त्यांना एका गंभीर भूमिकेत घेतलं. पाकिस्तानी ISI अधिकाऱ्याची भूमिका केली.
या भूमिकेत त्यांनी इतकी प्रभावी कामगिरी केली की शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आदित्य धर यांनी त्यांना सांगितलं. “आता छोटा रोल केला आहेस, पण पुढच्या चित्रपटात तुमच्यासाठी महत्त्वाचा रोल असेल.”
‘धुरंधर: द रिवेंज’ मध्ये त्यांना ‘जमील जमाली’ ही भूमिका मिळाली. एक गुंतागुंतीचा, प्रभावशाली राजकारणी म्हणून त्यांना चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या भूमिकेसाठी त्यांनी विनोद बाजूला ठेवला, खऱ्या राजकारण्यांचे हावभाव अभ्यासले, स्वतःची इमेज बदलली.
आज ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार करत इतिहास घडवला आहे. 71 व्या वर्षी त्यांनी सिद्ध केलं की, स्वप्नांना वयाचं बंधन नसतं. राकेश बेदी यांची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यभर मेहनत करूनही उशिरा यश मिळालं, तरी त्याची किंमत जास्त असते.