

Raja Shivaji Box Office Collection Day 27: मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा अजूनही कायम आहे. रिलीज होऊन चार आठवड्यांहून अधिक काळ उलटूनही या ऐतिहासिक चित्रपटाची कमाई थांबण्याचं नाव घेत नाहीये. उलट, चित्रपट एकामागून एक नवे विक्रम आपल्या नावावर करताना दिसत आहे. आता ‘राजा शिवाजी’ने आणखी एक मोठा टप्पा गाठत अभिषेक बच्चनच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अभिषेक बच्चनच्या ‘बोल बच्चन’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. त्यामुळे हा चित्रपट आता अभिषेक बच्चनच्या करिअरमधील भारतात सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे.
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने रिलीजच्या 27 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या बुधवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 40 लाख रुपयांची कमाई केली. त्याआधी तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाने 45 लाख रुपये कमावले होते.
यासह चित्रपटाची भारतातील एकूण कमाई आता 102.7 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 121.2 कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, ‘राजा शिवाजी’ हा मराठी सिनेसृष्टीतील 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
102.7 कोटींच्या कमाईसह ‘राजा शिवाजी’ने अभिषेक बच्चनच्या ‘बोल बच्चन’ (102 कोटी) या चित्रपटाला मागे टाकले आहे. आता या चित्रपटाच्या निशाण्यावर ‘हाउसफुल 3’चं 107.7 कोटींचं लाइफटाइम कलेक्शन आहे. चित्रपटाची सध्याची कमाई पाहता, पाचव्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ हा विक्रमही सहज मोडू शकतो, अशी चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू आहे.
सध्या अभिषेक बच्चनच्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धूम 3’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘हाउसफुल 5’ आणि ‘हाउसफुल 3’ हे चित्रपट आघाडीवर आहेत. मात्र ‘राजा शिवाजी’ने आता ‘बोल बच्चन’ला मागे टाकत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे.
चित्रपटात संजय दत्त, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, बोमन इराणी आणि महेश मांजरेकर यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक विषय आणि प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद यामुळे ‘राजा शिवाजी’ची घोडदौड अजूनही कायम असल्याचं चित्र दिसत आहे.