

मुंबई : ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित सिक्वेल ‘रेड २’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे १०० कोटींचा आकडा पार केला आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगन आणि रितेश देशमुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केलीय. चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. भारतात आतापर्यंत १२४.५१ कोटींची कमाई केली आहे. केसरी चॅप्टर २, स्काय फोर्स, जाट, सिकंदर चित्रपटांना मागे टाकले आहे. हा चित्रपट १ मे रोजी रिलीज झाला होता.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगन, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय देवगनच्या समोर झळकलेली अभिनेत्री वाणी कपूरने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. रजत कपूर, सौरभ शुक्ला, अमित सियाल, बृजेंद्र काला, यशपाल शर्मा, गोविंद नामदेव यासारखे सहाय्यक कलाकार देखील आहेत.
वाणी कपूर म्हणाली, “रेड २ ने १०० कोटींचा टप्पा पार केला आणि एक ब्लॉकबस्टर म्हणून साजरा केला जात आहे, यासाठी मी अत्यंत आभारी आहे. या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या अभिनयाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करते. एक अभिनेत्री म्हणून, मी विविध प्रकारचे भूमिकांमध्ये काम करण्याचा आणि प्रत्येक प्रोजेक्टमधून शिकण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांकडून मिळणारा असा प्रतिसाद खूपच प्रेरणादायक आणि समाधान देणारा असतो. 'रेड २' च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करते. देशभरातून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप खास आहे.”
या मैलाचा दगड गाठून, ‘रेड 2’ने आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली असून, वर्षातील एक प्रमुख हिट म्हणून आपली जागा पक्की केली आहे.