Rahul Narwekar: 'नया है यह', 'काय रे ही तुझी भाषा'... मराठी कलाकारांनी घेतली राहुल नार्वेकरांची शाळा; कोण काय म्हणालं?

Rahul Narwekar Controversy Over Marathi Reading: आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावावेळी झालेल्या मराठी उच्चारांच्या चुकांमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Rahul Narwekar Marathi
Rahul Narwekar MarathiPudhari
Published on
Updated on

Rahul Narwekar Controversy Over Marathi Reading: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सभागृहात मांडलेल्या शोकप्रस्तावादरम्यान केलेल्या मराठी वाचनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या उच्चारांच्या चुका, तसेच 'दीनानाथ मंगेशकर' यांचा उल्लेख चुकीने 'दीनदयाल' असा केल्यामुळे विरोधक, साहित्यिक, कलाकार आणि सोशल मीडिया युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंचा संताप

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मराठी भाषेचा झालेला कथित अवमान आणि सभागृहातील सदस्यांची शांत भूमिका यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी म्हटले की, आशा भोसले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या शोकप्रस्तावावेळी मराठी भाषेचे झालेले चुकीचे वाचन हे अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच, सभागृहात उपस्थित असलेल्या कोणत्याही आमदाराने त्यावर आक्षेप न घेतल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावर टीकेची झोड

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. हातात लिखित मजकूर असूनही तो अचूकपणे वाचता आला नाही, अशी टीका अनेकांनी केली.

काहींनी मराठी भाषेच्या वापराबाबत लोकप्रतिनिधींनी अधिक सजग असण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला धक्का देणारा असल्याचे म्हटले.

अभिनेते वैभव मांगले यांचीही प्रतिक्रिया

लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनीदेखील फेसबुक पोस्टद्वारे या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी विनोदी शैलीत भाष्य करत मराठी वाचनाच्या समस्येकडे लक्ष वेधले.

त्यांनी लिहिले की, अनेकजण मराठी बोलू शकतात, मात्र छापील मराठी वाचण्याचा सराव नसल्याने अशा चुका घडतात. विशेषतः इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या अनेकांना शुद्ध मराठी वाचन कठीण जाते, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी त्यांच्या ‘टाईमपास’ चित्रपटातील लोकप्रिय संवादावर आधारित एक मीमही शेअर केले.

Rahul Narwekar Marathi
Eetha Teaser Out: नऊवारी साडी, पायांमध्ये घुंगरू, लावणीचा ठसका आणि प्रेक्षकांच्या शिट्ट्या; 'ईठा’चा टीझर पाहून चाहते थक्क

हेमंत ढोमेची टीका

चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमेने देखील या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत नार्वेकर यांच्यावर टीका केली. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, ''आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला! म्हणून मराठी शाळा टिकवा, पोरांना मराठी बोलायला शिकवा! नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!''

चिन्मयी सुमीत यांची खोचक पोस्ट

अभिनेत्री आणि लेखिका चिन्मयी सुमीत यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना, "आता तरी भाषेसाठी लढाल का?" असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या पोस्टलाही सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.

Chinmayee Sumeet
Chinmayee SumeetPudhari

मराठी भाषेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा

या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी भाषेचा वापर, शुद्ध उच्चार यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी मराठी भाषेबाबत अधिक संवेदनशील आणि सजग असावे, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या वादावर राहुल नार्वेकर किंवा विधानसभा सचिवालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील चर्चा आणि राजकीय प्रतिक्रिया यामुळे हा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news