

पुढारी ऑनलाईन डेस्क - अल्ट्रा झकास आणखी एक रोमांचक वेब सीरीज आणत आहे - ‘राख’! ही वेब सीरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे. तसेच ही वेब सीरीज २१ मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून याआधी सोशल मीडियावर त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
सामाजिक अन्याय, राजकीय कटकारस्थानं आणि पोलिस दलातील संघर्ष यासारख्या विषयांवर आधारित ‘राख’ ही वेब सिरीज ७ भागांमध्ये प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. एका निडर पोलिस अधिकाऱ्याची सत्याच्या शोधात चाललेली धडपड, त्याला मिळणारे खरे-खोटे संकेत, आणि या संपूर्ण प्रवासात त्याच्याच भोवती विळखा घालणारी एक अंधारी आणि धक्कादायक दुनिया, हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक भाग नवीन रहस्य उलगडत जाईल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केलं आहे. त्यांच्या दिग्दर्शनशैलीत वास्तववाद, सस्पेन्स आणि थरार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच निर्मितीची जबाबदारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी देखील समर्थपणे सांभाळली आहे. यामध्ये अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दस्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण आणि कृष्ण रघुवंशी यांसारखे ताकदीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.