मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा ’; म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

फतवा
फतवा

पुढारी ऑनलाईन : गोष्टी नामंजूर असल्या की, त्याविरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. आता 'फतवा' हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाचा टीझरही याप्रसंगी प्रदर्शित करण्यात आला.

ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित 'फतवा' चित्रपट ९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी 'फतवा' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर येत आहे. या दोघांसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे, अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार 'फतवा'मध्ये दिसणार आहेत. डॉ. यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात. 'फ़तवा' चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने याप्रसंगी व्यक्त केला.

वेगवेगळ्या ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली 'अलगद मन', 'प्रेमाचा गोंधळ' ही दोन गाणी चित्रपटात असून 'अलगद मन' हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर 'प्रेमाचा गोंधळ' हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं 'चोरून चोरून', 'सजनी दोघं एक होऊ' या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर, वेदा नेरुरकर यांचे मधुर स्वर लाभले असून संजीव–दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे.

गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं 'पुन्हा पुन्हा' या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम, प्रवीण पगारे, सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. आराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं 'अली मौला' ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. 'फतवा' चित्रपटाची कथा प्रतिक गौतम यांची आहे. छायांकन दिलशाद व्ही. ए. तर संकलन फैजल महाडिक, इमरान महाडिक यांचे आहे. कला योगेश इंगळे तर साहसदृश्य कौशल मोजेस यांची आहेत. रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे तर वेशभूषा वर्षा यांची आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news