Prajakta Mali Movie | प्राजक्ताची घोषणा, 'फुलवंती' यादिवशी प्रदर्शित होणार

वाढदिवसाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीची घोषणा
prajakta mali phullwanti movie
प्राजक्ता माळीचा आगामी चित्रपट फुलवंतीचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या 'फुलवंती' या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. निर्माती प्राजक्ता माळी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक लक्षवेधी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत झळकणार आहे. स्नेहल तरडे एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाच्या असून 'फुलवंती'च्या निमित्ताने त्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

फुलवंती चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली 'फुलवंती' दिमाखत बसलेली दिसत आहे. पोस्टरला देण्यात आलेल्या संगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतात. “पद्मविभूषण दिवंगत बाबासाहेब पुरंदरे” यांच्या 'फुलवंती' या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.

प्राजक्ता माळी काय म्हणते?

'फुलवंती'बद्दल प्राजक्ता माळी म्हणते, ''या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले; याबद्दल देवाचे अनेकानेक आभार. 'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की 'फुलवंती'च का? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले; साहित्य क्षेत्रातील काही दुर्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' या कांदंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून, मेहनत घेऊन आम्ही ही भव्य 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत.''

'फुलवंती'मध्ये साथ लाभलेल्या कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी, मंगेश पवार, अमोल जोशी, विक्रम धाकतोडे, श्वेता माळी आणि स्नेहल तरडे या सगळ्यांचेच मी आभार मानते. 'फुलवंती' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मला खात्री आहे, ही मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल.'

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार ॲन्ड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी निर्माते आहेत. अमोल जोशी प्रॉडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी, सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून; छायाचित्रकार महेश लिमये यांनी छायाचित्रण तर संगीत अविनाश - विश्वजीत यांचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news