पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित, पंकज त्रिपाठी अभिनीत 'मैं अटल हूं' चे दिग्दर्शन रवी जाधव केले यांनी केले आहे. भानुशाली स्टुडिओच्या विनोद भानुशाली यांची प्रस्तुती, सिनेमाचे स्ट्रीमिंग १४ मार्च रोजी झी ५ वर होणार असल्याची घोषणा करण्यात आली. (Main Atal Hoon) या सिनेमात अष्टपैलू, राष्ट्रीय पारितोषिक-प्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी हे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते फिल्ममेकर रवी जाधव यांचे दिग्दर्शन आहे. (Main Atal Hoon)
डिसेंबर २०१४ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, चार दशकांहून अधिक कालावधीच्या बहारदार राजकीय प्रवासाचा मागोवा 'मैं अटल हूं' मध्ये घेण्यात आला आहे. भानुशाली स्टुडिओज आणि लेजंड स्टुडिओज बॅनरखाली विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांची निर्मिती आहे. या चित्रपटाचा जागतिक डिजीटल प्रीमियर १४ मार्च रोजी झी ५ वर होणार आहे.
पंकज त्रिपाठी म्हणाले, "आपल्या देशाची यशस्वी पायाभरणी करणाऱ्या देशातील सर्वात नामवंत नेत्यांपैकी एकाची भूमिका करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खरा सन्मान होता. मला अटलजी आणि त्यांच्या उल्लेखनीय राजकीय प्रवासाची जाणीव होती. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांच्या जीवनातील आणखी अनेक प्रेरणादायी गुण आणि पैलूंची ओळख करून घेता आली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जीवनावर एक अमीट छाप सोडली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा उभी करणे हे खरोखरच माझ्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्यांपैकी आहे. त्यासाठी मी आभार व्यक्त करतो."
दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, 'मैं अटल हूं' साठी पंकज त्रिपाठी हा एकमेव पर्याय होता. कारण त्याच्याकडे या प्रतिष्ठित व्यक्तीमधील सौम्य गुण आहेत. पंकजच्या सहभागाने हा प्रवास खरोखरच अधिक उल्लेखनीय झाला. 'मैं अटल हूं' ही अटलजींना वाहिलेली आमची छोटीशी आदरांजली आहे – ते एक प्रेरणादायी नेते होते.