Pallavi Joshi | १०० वर्षांच्या महिलेची भूमिका साकारणारी पहिली अभिनेत्री ठरली पल्लवी जोशी
Historical role of Pallavi Joshi film The Bengal Files
मुंबई - अभिनेत्री ते निर्माती झालेली पल्लवी जोशी आता ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन करत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात पल्लवी जोशीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या पूर्वीच्या चित्रपटांप्रमाणे, यातही समाजाभिमुख कथा प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.
पल्लवी जोशी ‘माता भारती’ची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका देशाच्या ममता, निरागसता आणि जिद्दीचे प्रतीक आहे. मात्र ही भूमिका साकारणे त्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते, कारण या पात्रामध्ये अनेक भावनिक स्तर आहेत, आणि प्रत्येक पैलूला प्रामाणिकपणे साकारणे हे मोठे आव्हान होते.
पल्लवी जोशी काय म्हणाली?
पल्लवी जोशी म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक होता. वयस्कर दिसणे हे सोपे नाही. प्रोस्थेटिक मेकअपमुळे मी बर्याच वेळा भयावह दिसत होते, पण आम्हाला एक असे चेहरा हवा होता जो प्रेमळ आणि निरागस वाटावा. ‘माता भारती’ या पात्रात ऊब आणि आपुलकी दिसायला हवी होती.”
“माझ्याकडे एकच संदर्भ होता – माझी आजी. त्या मला खूप वृद्ध आठवतात पण तेवढ्याच प्रेमळही. आम्ही या लुकवर सुमारे ६ महिने काम केले. त्या काळात मी स्किन केअर पूर्णपणे बंद केली जेणेकरून माझी त्वचा कोरडी आणि वृद्ध वाटावी. रोज मी ‘माता भारती’ आणि त्यांच्या डिमेन्शिया या अवस्थेवर काम करत होते, जोपर्यंत ती माझ्या अंगवळणी पडली नाही. आमच्या तांत्रिक टीमनेही हे लुक आणि पात्र अधिकाधिक वास्तवदर्शी वाटावे यासाठी अपार मेहनत घेतली. आणि जो अंतिम परिणाम समोर आला, तो प्रेक्षकांना दिसेलच.”
‘द बंगाल फाईल्स’ ही कथा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिली आहे. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झाली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार यांच्या भूमिका आहेत. तेज नारायण अग्रवाल आणि ‘आय एम बुद्धा’ प्रस्तुत ही फिल्म विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाईल्स ट्रिलॉजी’चा तिसरा भाग आहे. यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ प्रदर्शित झाल्या आहेत. ‘द बंगाल फाईल्स’ ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

