

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला. दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ले करून भारतीय सेनेने जिगरबाज कामगिरी केली. ऑपरेशन सिंदूर असे समर्पक नाव असलेल्या या मोहिमेनंतर मात्र पाकिस्तानी कलाकारांनी सोशल मिडियावर भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे.
यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे माहिरा खान. शाहरुखसोबत रईस या सिनेमातून माहिरा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. माहिरा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणते, मी नशीबवान आहे की मी अशा देशात राहते जिथे मला हवे ते बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. आमच्या देशावर अन्याय होत असेल तर आम्ही तिथे बोलणार. माझ्या देशावर कोणताही पुरावा नसताना आरोप केला आणि हल्लाही केला. या हल्ल्याचा मी निषेध करते.
इंडिया तुमचे पाकिस्तान द्वेष आणि युद्धाची मानसिकता गेली अनेक वर्षे तशीच आहे. मी हा द्वेष डोळ्याने पाहिला आहे आणि अनुभवला पण आहे. भारतीय मीडियाही ही दरी निर्माण करण्यात अग्रेसर आहे. भारताचा शक्तिशाली आवाज नेहमीच अशा युद्ध आणि नरसंहारावेळी गप्प बसतो. यामुळे हे सिद्ध होते की ही भीतीच आहे जो हा आवाज बंद करते. तुम्ही रात्रीच्या वेळी शहरात अटॅक करता आणि याला विजय म्हणता? लाज वाटायला हवी. माझ्या प्रिय पाकिस्तान माझे तुझ्यावर प्रेम आहे.
ही गरळ ओकणारी माहिरा एकटीच नाही. तिच्यासोबत हानिया आमीर या पाकिस्तानी अभिनेत्रीनेही भारताविरोधातील विखार सोशल मिडियावर जाहीर केला आहे. ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते, ‘माझ्या जवळ आता कोणतेही शब्द नाहीयेत. माझ्याजवळ फक्त राग, दु:ख आणि वेदनेने भरलेले ह्रदय आहे. एक लहान मूल गेले. कुटुंब विस्कळीत झाले आणि हे कशासाठी? अशा पद्धतीने तुम्ही कोणाचे संरक्षण करू शकत नाही. ही क्रूरता आहे. तुम्ही निर्दोष लोकांवर बॉम्बवर्षाव करून त्याला रणनीती म्हणू शकत नाही. ही ताकद नाही दुबळेपणा आहे.
तर अलीकडेच भारतात सिनेमा रिलीज होण्यास बंदी आलेला फवाद खानही याबाबत कठोर शब्द बोलताना दिसतो आहे. तो म्हणतो, या लाजिरवाण्या हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येकाविरोधात माझी संवेदना आहे. भारतात या सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंटही बॅन केले आहेत. तर फवाद खानचा आगामी सिनेमा अबीर गुलाल हा भारतात बॅन करण्यात आला आहे.