पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर सद्या चांगलेच चर्चेत आहेत. सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या कानाखाली वाजवल्याप्रकरणी ते चांगलेच ट्रोल होतांना दिसत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा नानांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ बघून चाहत्यांनी नानांना धारेवर धरलं असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पण या व्हिडीओमध्ये घडलेली घटना ही शूटिंगचाच एक भाग असल्याचं बोललं जातंय. याबाबत स्वतः नानांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी 'जर्नी' या सिनेमाचं शूटिंग बनारस येथे करत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा नानांचा एक व्हिडीओ ज्यामध्ये एक मुलगा येऊन नानांसोबत सेल्फी घ्यायला पुढे येतो तेवढ्यात नाना त्या मुलाला डोक्यावर जोरात चापट मारतात. त्यानंतर नानांसोबत उभा असणारा एक व्यक्ती त्या मुलाच्या मानेला पडकून त्याला बाहेर ढकलून देतो. या सर्व घटनेच चित्रीकरण असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेचे मोठ्या प्रमाणात पडसाद बघायला मिळत आहेत. कित्येक जण नानांना ट्रोल करीत आहेत. याबाबत नानांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देऊन या घटनेबद्दल माफी सुद्धा मागितली. "व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेली घटना ही माझ्या आगामी 'जर्नी' या सिनेमाचा भाग असून, या सिनेमात मी डोक्यावर टोपी घातली आहे आणि एक व्यक्ती मला म्हणत आहे,"ए म्हाताऱ्या तुझ्या डोक्यावर असलेली टोपी विकायची आहे का?". त्यावर मी त्या व्यक्तीला मारतो आणि पळवून लावतो".
नाना पाटेकर पुढे म्हणाले की,"जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दृश्याची तालिम सुरू होती. पण कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ शूट करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला पण तोपर्यंत तो मुलगा तिथून निघून गेला होता".
नाना पाटेकर पुढे म्हणाले की ,"मी असं कधीच वागत नाही. कधीही कोणावर हात उचलत नाही. उलट लोकांवर खूप प्रेम करतो. पण नकळत झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही शूटिंगदरम्यान मला अनेक लोकांकडून पाठिंबा मिळत आहे. स्थानिक लोक कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही आहेत".
हेही वाचा