नाशिक : पेटवलेलं रॉकेट थेट गॅलरीत शिरलं, खुटवडनगरला आग लागून लाखोंचे साहित्य खाक | पुढारी

नाशिक : पेटवलेलं रॉकेट थेट गॅलरीत शिरलं, खुटवडनगरला आग लागून लाखोंचे साहित्य खाक

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; भाऊबीज च्या दिवशी खुटवडनगरला रात्री घराच्या गॅलरीत पेटवलेलं रॉकेट शिरल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात भाऊबीजेला आलेल्या बहिणीचे कपडे, लॅपटॉप तसेच दिवाळी सणाचे नवीन कपडे व घरगुती साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

खुटवड नगर पोलीस चौकी शेजारील सुरेश बापू प्लाझा इमारतीत ही घटना घडली. शैलेश सुंदरम हे सात नंबरच्या फ्लॅट मध्ये राहतात. त्याच्याकडे दिवाळीसाठी त्यांच्या बहीणीसह कुटुंब परिवार आले होते. भाऊबीजची ओवाळणी करून सुंदरम व पाहुणे बाहेर फिरायला गेले होते. या वेळी रात्री १० वाजेच्या सुमारास  बाहेरून एक फटाक्याचे राॅकेट गॅलेरीत आत आल्याने पेट घेतला. यात गॅलरीत ठेवण्यात आलेले बहिणीचे नवीन साड्या, दोन लॅपटॉप तसेच दिवाळीतील नवीन कपडे तसेच सोपा पलंग व गाद्या जळून खाक झाले. आग लागल्यानंतर घटनेची माहिती नागरिकांनी सातपूर अग्निशामन दलाला दिली. अग्निशामक दलाचे कर्मचारी पी.बी परदेशी.एस .आर .जाधव. ए .पी .मोरे . उन्हाळे सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

एक तासाच्या अथक परिश्रम नंतर आग आटोक्यात आणली. तर इमारती मधील नागरिकांनी घटनेची माहिती सुंदरम यांना दिली तसेच इमारतीतील नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील वस्तु बाहेर काढल्याने होणारे नुकसान वाचविले.

Back to top button