पुढारी ऑनलाईन डेस्क
अनुभव सिन्हा दिग्दर्शित नेटफ्लिक्स सीरीज 'IC814 : द कंधार हायजॅक' वादात सापडलीय. २९ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या वेब सीरीजला एकीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे या सीरीजमध्ये दहशतवाद्यांचा उल्लेख भोला आणि शंकर या टोपणनावांनी केल्याने वाद सुरु झालाय.या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाकडून सीरीजमधील संभाव्य वादग्रस्त कंटेंटबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर Netflix इंडियाने आपले म्हणणे मांडले आहे.
आज मंगळवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत, नेटफ्लिक्स इंडियाने भविष्यातील प्रोजेक्ट्स राष्ट्रीय भावनांशी सुसंगत आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी त्याच्या कंटेंटचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
"Netflix ने कंटेंटचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील भविष्यातील सर्व कंटेंट संवेदनशील आणि देशाच्या भावनांशी सुसंगत असेल." असे सरकारी सुत्रांनी म्हटले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडिया कंटेंट हेडला याबाबत नोटीस बजावली होती. त्यांना 'IC814' वेब सीरीज कंटेंट संदर्भात आज चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांच्यात सुमारे तासभर बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे.
'IC-814 - द कंदाहार हायजॅक' ही वेब सीरीज रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले होते. या सीरीजमध्ये १९९९ मधील भारताच्या विमान अपहरणात सहभागी असलेल्या अपहरणकर्त्यांचा 'चीफ', 'डॉक्टर', 'बर्गर,' 'भोला' आणि 'शंकर' अशा टोपणनावांनी उल्लेख केला आहे. हे व्यक्तिचित्रण गुन्हेगारांना 'मानवी' दृष्टीकोनातून सादर केले गेले आहे, असा दावा काही दर्शकांनी केला आहे. ANI च्या वृत्तानुसार, Netflix टीमने संदर्भासाठी गोळा केलेले संशोधन दस्तऐवज आणि फुटेज सादर केले आणि त्यांचा दावा आहे ही सीरीज पुस्तके आणि सरकारी विधानांमधील माहितीसह सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या संसाधनांशी सुसंगत आहे.
इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-८१४ चे २४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून अपहरण करण्यात करण्यात आले होते. हे विमान काठमांडूतून दिल्लीला जाणार होते. पण अपहरणकर्त्यांनी त्याला कंधार, अफगाणिस्तानात नेले होते.