

Netflix Free Trial: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ने जवळपास सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोफत ट्रायल ऑफर सुरू केल्याची चर्चा आहे. कंपनीने काही निवडक देशांमधील नवीन युजर्ससाठी फ्री ट्रायल उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पात्र (Eligible) युजर्सना कोणतेही शुल्क न भरता ठरावीक कालावधीसाठी Netflix वरील चित्रपट, वेब सिरीज आणि शो पाहण्याची संधी मिळू शकते.
Netflix च्या हेल्प सेंटरनुसार, नवीन खाते तयार करताना जर तुमचे अकाउंट, डिव्हाइस आणि लोकेशन फ्री ट्रायलसाठी पात्र असेल, तर साइन-अप प्रक्रियेदरम्यान हा पर्याय आपोआप दिसेल. जर फ्री ट्रायलचा पर्याय दिसत नसेल, तर सध्या तुमचे खाते या ऑफरसाठी पात्र नसल्याचे समजावे.
भारतात Netflix ने या ऑफरबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी काही अहवालांनुसार नवीन ई-मेल आयडी वापरून Netflix खाते तयार करताना '0 रुपयांत 30 दिवस वापरून पाहा' असा पर्याय काही युजर्सना दिसत आहे. मात्र, ही सुविधा सर्वांनाच उपलब्ध असेल, असे नाही.
अहवालानुसार, काही युजर्सना 30 दिवसांचा, तर काहींना 15 दिवसांचा फ्री ट्रायल देण्यात येत आहे. यावरून Netflix वेगवेगळ्या युजर्सवर वेगवेगळ्या ऑफर्सची चाचणी (A/B Testing) करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Netflix ने अनेक वर्षे नवीन ग्राहकांना 30 दिवसांचा मोफत ट्रायल दिला होता. मात्र, 2020 मध्ये कंपनीने ही सुविधा जगभरात बंद केली होती. आता पुन्हा मर्यादित स्वरूपात हे ट्रायल सुरू करून अधिकाधिक नवीन ग्राहकांना आकर्षित करता येते का, याची चाचणी कंपनी करत असल्याचे मानले जात आहे.
ही ऑफर सर्व देशांमध्ये किंवा सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही. त्यामुळे Netflix वर नवीन खाते तयार करताना फ्री ट्रायलचा पर्याय दिसल्यास त्याचा लाभ घेता येईल. भविष्यात भारतात ही सुविधा अधिकृतपणे सर्वांसाठी उपलब्ध होणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.