पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ऋषभने "द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज" (The Pride of Bharat : Chhatrapati Shivaji Maharaj) चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट जगभरातील सिनेमागृहात २१ जानेवारी २०२७ रोजी रिलीज होईल.
ऋषभने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हटले आहे, "आमचा सन्मान आणि विशेषाधिकार, भारताच्या महान योद्धा राजाची महाकथा सादर करत आहे, "द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज". हा केवळ एक चित्रपट नाही तर तो एका योद्धाच्या सन्मानार्थ एक युद्धनाद आहे; ज्यांनी सर्व संकटांशी लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिले आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला.'' असे ऋषभने पोस्टमध्ये म्हटले आहे.
ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंग यांनी केले आहे. संदीपने याआधी मेरी कॉम, सरबजीत, वीर सावरकर, रामलीला यांसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. आता तो ऋषभ शेट्टी सोबत काम करत आहे.
ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कमी बजेटमधील (Kantara Chapter 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. याआधी त्याच्या ‘जय हनुमान’चा फर्स्ट लूक आता समोर आला होता. ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाच्या रुपात दिसणार आहे.