

पुढारी ऑनलाईन डेस्क - एमी ॲवॉर्ड्स २०२५ ची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियन Nate Bargatze करणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. १४ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ८ वाजता लॉस एंजिल्सच्या पीकॉक थिएटरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
Nate Bargatze हे अमेरिकेतील प्रख्यात विनोदी कलाकार असून त्याच्या विनोदी शैलीसाठी तो ओळखला जातो. नेटफ्लिक्सवरील त्यांच्या स्टँड-अप स्पेशल्सना प्रचंड लोकप्रियता मिळाली असून २०२४ मध्ये "The Be Funny Tour" शो साठी त्याला प्रेक्षकांनी दाद दिली होती.
एमी ॲवॉर्ड्स हे अमेरिकन टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वोच्च मानाचे पुरस्कार असून दरवर्षी उत्कृष्ट मालिका, अभिनेता, दिग्दर्शक आणि इतर तांत्रिक विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. जगभरातील चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Nate Bargatze म्हणाले, "अशा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि मी अशा संध्याकाळचे आयोजन करण्यासाठी खूप उत्साहित आहे, ज्याचा आनंद जगभरातील परिवार घेऊ शकतील."
हा सोहळा भारतात १५ सप्टेंबरला (भारतीय वेळेनुसार) पाहता येणार आहे.