

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेली मोनालिसा भोसले या घाऱ्या डोळ्यांच्या सुंदर तरूणीला चित्रपटाची लॉटरी लागली आहे. ती बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या मोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालण्यात ती यशस्वी ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी घाऱ्या डोळ्यांची व मोहक हास्य असलेली मोनालिसा भोसले ही सुंदर तरुणी रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी तरूणांची झुंबड उडाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. रुद्राक्षाच्या माळा विकून उदरनिर्वाह करणारी मोनालिसाला यामुळे आपला व्यवसाय करता येत नव्हता. त्यामुळे ती कुंभमेळा सोडून आपल्या गावी परतली होती.
ही मोनालिसा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिला एका हिंदी चित्रपटाची ऑफर आली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा 'द डायरी ऑफ मणिपूर' हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात त्यांनी मोनालिसाला कास्ट केले आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून मोनालिसा दिसणार आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत असल्याने तिला या चित्रपटासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. 'डायरी ऑफ मणिपूर' हा चित्रपट मणिपूरमध्ये घडलेल्या एका भयानक घटनेवर आधारित असणार आहे. दिग्दर्शक मिश्रा यांनी स्वत : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथील मोनालिसाच्या घरी भेट देत तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली असून लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.
मोनालिसा ही मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. प्रयागराज महाकुंभात तिच्या सुंदर डोळ्यांमुळे आणि निरागस हास्यामुळे ती व्हायरल झाली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की तिच्यावर अनेक भोजपुरी गाणीही बनली आहेत. एका वृतानुसार, मोनालिसा 'डायरी ऑफ मणिपूर' हा चित्रपटात एका लष्करी सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे बजेट २० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.