पुढारी ऑनलाईन डेस्क : अबोली मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जातंय. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे. अखेर मनवाला न्याय देण्यासाठी अबोलीने आव्हान स्वीकारलं आहे. प्रतापरावाच्या विरोधात आता अबोली मनवासाठी लढणार आहे.
अबोलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी खूपच उत्सुक आहे. याचसाठी केला होता अट्टहास अशी भावना तिने व्यक्त केली. वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. माझ्या आजोबांचं स्वप्न होतं माझ्या आईने वकील व्हावं. आई वकील होऊ शकली नाही. मात्र मला जेव्हा वकिलाच्या रुपात आईने पाहिलं तेव्हा तिला गहिवरुन आलं.
कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका जगता येतात. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. अबोलीच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची खात्री आहे. अबोलीचा न्यायासाठीचा हा लढा रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.