

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांत त्यांनी काम केलं होतं. मराठी रंगभूमीवर त्यांना प्रेमाताई नावाने ओळखले जायचे. त्यांनी स्पेशल २६, द इम्पॉसिबल मर्डर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुल ३ धमाल, सावित्री बानो, आजी तेंडुलकर या चित्रपटांत अभिनय केले होते. त्यांनी प्रपंच मालिकेत काम केले होते. प्रेमा साखरदांडे यांनी ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तक लिहिलं आहे.
माहीम इथल्या राहत्या घरी गुरुवारी (ता. ६ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या आहेत. रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये प्रेमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रेमा साखरदांडे या ध्वनीमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या. अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या त्या बहिण होत्या. ज्योत्स्ना कार्येकर, आशा दंडवते या अन्य दोन्ही बहिणीही अभिनय क्षेत्रात होत्या.