“अप्सरा” चित्रपट यादिवशी होणार रिलीज; गीतकार मंगेश कांगणे यांचे संगीतकार म्हणून पदार्पण

प्रवीण तरडे-मंगेश कागणे
प्रवीण तरडे-मंगेश कागणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सूर निरागस हो, माझा आनंद हरपला' अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी "अप्सरा" या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली आहेत. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या हस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुनील भालेराव यांच्या 'श्रमण फिल्म्स' या निर्मिती संस्थेतर्फे "अप्सरा" चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.

मंगेश कागणे म्हणाले, २०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील" टिकटिक वाजते डोक्यात" या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक या क्षेत्रात काम करुन जवळपास १२५ हून अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. संगीतकार म्हणून "अप्सरा" च्या निमित्ताने मला ही संधी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

"अप्सरा" चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तिन्हीही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news