

अनुपमा गुंडे
लग्नसंस्थाच नाही तर ॲरेंज मॅरेजमध्ये लग्न जमविण्याच्या पध्दतीवर समाजात वेळोवेळी चर्चा, उहापोह होत असतो. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यावर भाष्य केले जाते, पण तरीही समाजरचनेचा आजही मुलभूत घटक असलेल्या लग्नसंस्था आणि लग्न जमविण्याच्या पारंपारिक पद्धतीत विशेष बदल घडलेला नाही. झेन जी या दोन्हीत बदल घडवू पाहते आहे. पण पुन्हा समाजरूपी बागुलबुव्याची बेडी त्यांच्या पायात असते. परंपरांची ही बेडी तोडण्याचे धाडस करणारे आहेत. लग्नाच्या पांरपारिक बेडीला छेद देतांना हळूवार फुललेली प्रेमकथा म्हणजे मनाचे श्लोक.
मनाचे श्लोक म्हणजे समर्थ रामदासांच्या विचारांचा ठेवा चित्रपटात असेल असे वाटते. पण नावात काय आहे. चित्रपटाच्या नायक - नायिकेच्या नावाला समर्पक शीर्षकातून सुचलेले नाव एवढाच संदर्भ असावा. श्लोक (राहुल पेठे) साठी वधू संशोधन सुरू आहे. प्रत्येक मुलीला भेटल्यानंतर त्यांच्या मनात होकार की नकार आणि व्दंद या मनाच्या भाववस्थांची तीन रूपे (सुव्रत जोशी), (हरिष दुधाडे), (सिध्दार्थ मेनन) यांनी गाण्याच्या माध्यमातून साकारली आहेत. आई (शुभांगी गोखले) आणि वडील (अरूण टिकेकर) यांच्या आग्रहाखातर श्लोक एक स्थळ पाहण्यासाठी मनवा (मृण्ययी देशपांडे) च्या घरी येतात.
आपल्याला नेमके लग्न करायचे की नाही, बायको हवी तर ती कशी अशा कोणत्याही विचारात ठाम नसणाऱ्या श्लोकला मनवाचे स्पष्टवक्तेपणा आणि विचारांचा ठामपणा आवडतो. तर आलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देण्यासाठी क्लृप्त्या मनवा श्लोकसाठीही करते, तरीही श्लोक मनवाचा या वर्तनामागचे लॉजिक शोधण्यासाठी तिने लिहलेले ब्लॉग वाचतो. ती एक ट्रेकर आणि निसर्गावर ब्लॉग लिहत असते.
लग्नसंस्थेबद्दलची तिची मते, विचारांवर ठाम राहण्याची तिची वृत्ती, संवेदनशीलताआणि निरागसता यामुळे श्लोक तिच्या प्रेमात पडतो. पण तिच्या विचारांपुढे आपले प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तो करणार त्यातच त्या दोघांच्या एकत्र फोटो पाहून दोन्ही कुटुंबीय त्यांनी लग्नाला होकार दिल्याचा समज करतात, श्लोक हे जाणीवपूर्वक केल्याचा मनवाचा समज होतो, मात्र नियती पुन्हा हिमालयाच्या ट्रेकच्या निमित्ताने त्यांना एकत्र आणते.
या ट्रेक दरम्यान दोघांचे प्रेम फुलते, पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट लग्नाने होतो तसा या चित्रपटात होत नाही, तरीही ते दोघे एकत्र येतात, ते कसे आणि का...हे पाहण्यासाठी चित्रपटगृहातच जायला हवे. मन फकिरानंतर मृण्मयी देशपांडे यांनी दिग्दर्शनाचा भार दुसऱ्यांदा समर्थपणे पेलला आहे. मनवाची आई (लीना भागवत), वडील (मंगेश कदम), श्लोकची आई (शुभांगी गोखले) आणि वडील (अरूण टिकेकर) यांनी लग्नाळू मुलांच्या पालकांच्या भावनांचे यथार्थ दर्शन घडवले आहे.
लग्न जमवतांनाच्या पारंपारिक पध्दती ते लग्नसंस्था का आणि कशासाठी या गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या झेन जी ची व्यथेला स्पर्श करण्याचा चांगला प्रयत्न मृण्ययी देशपांडे यांनी केला आहे. सगळ्या कलाकारांची त्याला समर्पक साथ लाभली आहे.