

बॉलीवूडची ‘क्वीन’ दीपिका पदुकोण आता एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिची भारताची पहिली-वहिली ‘मानसिक आरोग्य सदिच्छा दूत’ म्हणून नियुक्ती केली आहे. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, त्यावरील कलंक पुसून काढणे आणि लोकांना योग्य मदत मिळवून देण्याच्या या मोठ्या लढ्याचे नेतृत्व आता दीपिका करणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ची संस्थापिका, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची देशाची पहिली-वहिली ‘मानसिक आरोग्य सदिच्छा दूत’ म्हणून निवड करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे देशात मानसिक आरोग्यासाठी अधिक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची पहिली-वहिली ‘मानसिक आरोग्य सदिच्छा दूत’ म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मानसिक आरोग्याच्या काळजीला प्राधान्य देण्यात मोठी प्रगती केली आहे. हीच गती पुढे नेण्यासाठी आणि आपल्या देशाची मानसिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मी मंत्रालयासोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहे, असे दीपिका म्हणाली.