

पुढारी ऑनलाईन डेस्क : Actress Mamta Kulkarni : 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. त्यासाठी ममता प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला पोहोचली आहे. ती आता किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर असणार आहे. शुक्रवारी (दि. 24) तिने या आखाड्याची दीक्षा स्वीकारली. ममता आता ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ या नावाने ओळखळी जाणार आहे. ममतताचे साध्वीच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ममताने 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिरंगा या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पुढे तिने जवळपास 40 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है आणि क्रांतिवीर यांसारख्या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत होती. 2001 मध्ये रिलीज झालेला छुपा रुस्तम हा तिचा शेवटचा ठरला. ममताने हिंदीशिवाय कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
ममता कुलकर्णीने 2000 साली देश सोडला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात ती मुंबईत परतली आहे. याआधी 2012 च्या कुंभमेळ्यात सहभागी व्हायला ती मायदेशी आली होती. 12 वर्षांनी भारतात आणि 25 वर्षांनंतर मुंबईत आल्याचे ममताने तेव्हा तिच्या पोस्टमध्ये सांगितले.
2015 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममताचे नाव आले होते. त्यानंतर ती देश सोडून गेली होती. दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात ममता व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावे आली होती. दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला ‘क्लीन चिट’ देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली.