

स्त्रीच्या आयुष्याकडे पाहण्याची पारंपरिक चौकट मोडून तिच्या संघर्षाची आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहण्याची गोष्ट सांगणारा ‘बंडखोर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील सहा महिलांच्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
टिझरमध्ये या सहा महिला एका ठिकाणी एकत्र येताना दिसतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि त्या कोणाविरोधात बंड पुकारत आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे टिझर पाहिल्यानंतर या सहा जणींच्या आयुष्याची कहाणी नेमकी कुठे आणि कशी वळण घेणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
‘बंडखोर’ हे नावच या चित्रपटाची दिशा स्पष्ट करतं. मात्र, या सहा महिलांचा संघर्ष नेमका कशासाठी आहे, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. समाजाने घालून दिलेल्या चौकटींविरोधात त्या उभ्या राहतात का? स्वतःच्या निर्णयांसाठी लढतात का? की आपल्या अस्तित्वासाठीच त्यांना ही बंडखोरी करावी लागते? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं की, ‘बंडखोर’ हा केवळ महिलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला सिनेमा नाही. या सहा स्त्रियांच्या आयुष्यातील प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या अनेक महिलांची झलक दिसू शकते. प्रत्येक महिलेची स्वतःची कहाणी, समस्या आणि त्यातून मार्ग काढण्याची वेगळी पद्धत असते. परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी तिच्याशी संघर्ष करणाऱ्या सहा महिलांची कथा या सिनेमातून पाहायला मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांच्या आयुष्यातील संघर्ष समजून घेण्यासाठी हा चित्रपट पुरुषांनीही आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा मैत्रिणीसोबत पाहावा, अशी अपेक्षाही मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे.
संजय शेटये यांच्या विनसन ग्राफिक प्रोडक्शनची निर्मिती आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. सहा वेगवेगळ्या महिलांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा २४ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे टिझरनंतर आता ‘बंडखोर’मध्ये या सहा जणींच्या संघर्षाची कहाणी कशी उलगडते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.