

पुढारी ऑनलाईन डेस्क - आपल्या सर्वांचे आवडते कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच एका आगामी मराठी चित्रपट "देवमाणूस" साठी एकत्र येत आहेत.
महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा चांगलाच उमटवला आहे. तर अभिनेत्री रेणुका शहाणे, हम आपके है कौन, अबोली, जानिवा यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभूतपूर्व भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत, त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकाची शोभा वाढवली आहे. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात दमदार कारकीर्दीसह, त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
महेश मांजरेकर म्हणाले, “देवमाणूस सारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणे हा माझासाठी एक खूप बहुप्रतीक्षित सर्जनशील प्रवास वाटतो. मी सध्या या नव्या ऑनस्क्रीन भागीदारीबद्दल खूप जास्त उत्साहित आहे आणि आशा करतो की, आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या या नव्या जोडीसाठी असाच उत्साह दाखवतील."
तसेच अभिनेत्री रेणुका शहाणे या म्हणाल्या, "देवमाणूसच्या निमित्ताने मी महेश सोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय, त्यामुळे असं वाटलंच नाही की, आम्ही यापूर्वी एकत्र काम केल नाहीये. मला खात्री आहे 'देवमाणूस' बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल. खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीये, त्याचा विशेष आनंद होतोय."
तेजस प्रभा विजय देवस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. "देवमाणूस" सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.