

पुढारी ऑनलाईन डेस्क: Ranveer Allahbadia |'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात प्रसिद्ध युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला महाराष्ट्र सायबरने आज (दि.१७) पुन्हा समन्स बजावले आहे. याद्वारे त्याला सोमवार २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
'इंडियाज गॉट लेटेंट' शो वाद: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबरने २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विनोदी कलाकार समय रैना यांना मंगळवार (१८ फेब्रुवारी) सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे.
रणवीर इलाहाबादियासह, अपूर्वा मुखिजा, आशिष चंचलानी, तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना देखील गुरूवार ६ मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहे. तर समय रैना, जसप्रीत सिंग आणि बलराज घई यांना मंगळवार ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर सेलने दिल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रणवीर अलाहबादिया कॉमेडी शो इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये गेस्ट म्हणून पोहोचला होता. तिथे त्याने एका कंटेस्टेंटशी पालकाबद्दल अश्लील प्रश्न विचारला. बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यावरून रणवीरवर लोक खूप भडकले. 'इंडिया गॉट लेटेंट' शो दरम्यान, केलेल्या आक्षेपार्ह विधानांविरोधात त्याच्यावर विविध राज्यामध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) देखील या प्रकरणाची दखल घेत रणवीर इलाहाबादिया यांना नोटीस बजवाली.
प्रचंड टीकेनंतर रणवीरने व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली. तो म्हणाला- ''माझी कॉमेंट न केवळ चुकीची होती तर ती अजिबात विनोदी नव्हती. मी इथे माफी मागायला आलो आहे. माझा निर्णय चुकीचा होता, असे करणे कूल नव्हते. पॉडकास्ट प्रत्येक वयातील लोक पाहतात. मी असा व्यक्ती बनू इच्छित नाही, जो ती जबाबदारी खूप हलक्यामध्ये घेतो. या संपूर्ण अनुभवातून माझी शिकवण हिच असेल की, मी या प्लॅटफॉर्मला उत्तम पद्धतीने चालवेन. मी वचन देतो की, मी उत्तम व्यक्ती बनेन. मी व्हिडिओ मेकर्सना सांगितले आहे की, त्यातील असंवेदनशील हिस्सा हटवावा. अखेरीस मी हे सांगू इच्छितो की, मला दु:ख आहे. मी अपेक्षा करतो की, एक माणूस म्हणून तुम्ही मला माफ कराल.''