

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'तुझ्यात जीव रंगला', ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. तिने येड लागलं प्रेमाचं आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री माधुरी पवार तीच्या नव्या प्रोजेक्ट विषयी सांगते, “देणेवाला जब भी देता…देता छप्पर फाडके अशी माझी सध्याची भावना आहे. माझ्याकडे काही चित्रपट व सीरीज असल्या कारणाने मी गेले २ वर्ष टीव्ही मालिका केलेली नाही. मालिकांचं आणि माझं जवळचं नातं आहे. अप्सरा आली हा डान्स रिॲलिटी शो जिंकल्यानंतर मी तुझ्यात जीव रंगला तसेच देवमाणूस या मालिका केल्या. मला मालिका आवडतात. कारण मालिकांमुळे आपण घराघरात दररोज पोहोचतो. आपलं काम लोकांपर्यंत पोहोचतं.”
पुढे ती सांगते, “मी आता दोन्हीकडे शूट करत आहे. स्टार प्रवाहवर येड लागलं प्रेमाचं आणि शिट्टी वाजली रे हे शोज मी करत आहे. येड लागलं प्रेमाचं या सीरियलमध्ये मी निकी हा नेगेटिव्ह रोल करत आहे. ही भूमिका बिनधास्त, नीडर आणि रावडी आहे. तर शिट्टी वाजली रे या रिॲलिटी शोमध्ये धम्माल मस्ती करताना मी तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्टमध्ये मी वेगवेगळ्या भूमिकेत तुमच्या भेटीला येणार आहे. माझा सगळ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे की, तुम्ही हे कार्यक्रम नक्की बघणार. तुमचं प्रेम कायम असचं राहो हिच सदिच्छा!”