पुढारी ऑनलाईन डेस्क : 'इंडियन आयडल सीझन १५' च्या ट्रॉफीवर मानसी घोषने नाव कोरले आहे. इंडियन आयडॉलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही मानसीच्या विजयाची घोषणा करण्यात आली.
'इंडियन आयडल सीझन १५' अंतिम सामना रविवार ६ एप्रिलला पार पडला. यावेळी स्पर्धकांनी त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स सादर केला. अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर मानसीच्या विजयाची घोषणा करून तिचे अभिनंदन करण्यात आले. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'इंडियन आयडल सीझन १५ जिंकल्याबद्दल मानसी घोषचे खूप खूप अभिनंदन!' काय आवाज, काय प्रवास! खरोखरच कौतुकास्पद, तु प्रत्येक कामगिरी संस्मरणीय बनवलीस.
अंतिम फेरीत मानसी घोषने स्पर्धक सुभाजित चक्रवर्ती आणि स्नेहा शंकर यांचा पराभव केला. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि प्रेक्षकांना आपल्या आवाजाची भुरळ पाडण्यात यशस्वी झाल्याने अव्वल स्थान मिळविण्यात तिला मदत झाली. विजेती बनल्यानंतर तिला एक नवीन कारही मिळाली.
'इंडियन आयडल सीझन १५' ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला. हा सीझन पाच महिने चालला. या दरम्यान अनेक स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने छाप सोडली. शेवटी तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. मानसी घोषने तिच्या उत्कृष्ट गायनाने हा शो जिंकला. मानसी संपूर्ण हंगामात परीक्षक आणि चाहत्यांची आवडती स्पर्धक राहिली. तिने आपल्या गायनाने सर्वांची वाहवा मिळवली.