लय आवडतेस तू मला : द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा
पुढारी ऑनलाईन डेस्क - 'कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या नव्या मालिका सुरू आहेत. आता महाराष्ट्राच्या मातीतली अशी एक प्रेमकथा येतेय, जी ना कधी पाहिली, ना कधी ऐकली. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर कोरली जाणारी, काळजाला भिडणारी अशी ही प्रेमकथा आहे. 'लय आवडतेस तू मला' असे या मालिकेचे नाव आहे.
अस्सल गावच्या मातीतली एक नवी कोरी अनोखी प्रेमकथा '#लय आवडतेस तू मला'चा जबरी प्रोमो समोर आला आहे. कळशी आणि साखरगाव या दोन जन्मोजन्मीचं वैर असलेल्या, एकमेकांच्या गावची वेस न ओलांडणाऱ्या दुष्मन गावांमधील एक रांगडी, झन्नाट प्रेमकथा प्रेक्षकांना 'लई आवडतेस तू मला' या मालिकेत पाहायला मिळेल. कळशी गावचा झुंजार गडी अर्थात सरकार साखरगावात आला अन् पाहताक्षणी साखरगावच्या साहेबवारांची लेक सानिकाच्या प्रेमात पडला.
'लय आवडतेस तू मला' या मालिकेच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
लय आवडतेस तू मलाच्या माध्यमातून मला पहिला ब्रेक दिल्याबद्दल आभार. मालिकेची गंमत म्हणजे मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आणि माझं नाव सानिकाच आहे. खूपच निरागस, भावूक, जिद्दी, प्रेमळ अशा विविध छटा असलेली सानिकाची भूमिका आहे. संघर्षातून फुलणारं प्रेम पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.
सानिका मोजर
तन्मय जक्का मालिकेबद्दल म्हणाला, "सरकार या पात्राबद्दल मला विचारलं गेलं तेव्हा या नावातच काहीतरी वेगळं असल्याचं मला जाणवलं. या पात्राला एक वेगळी शेड आहे. हे हटके पात्र साकारताना मला मजा येत आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं असं या मालिकेचं कथानक आहे. अॅक्शन, रोमान्स, विनोद, ड्रामा अशा प्रत्येक जॉनरला टच करण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे".