Kriti Sanon
मुंबई: अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि तिच्या कुटुंबाने मुंबईतील रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा मिळवला आहे. क्रिती सेनॉन, तिची बहीण नुपूर सेनॉन आणि आई गीता सेनॉन यांनी अंधेरी पश्चिम येथील चार फ्लॅट्स एकूण 8.9 कोटी रुपयांना विकले आहेत. विशेष म्हणजे, या मालमत्तांच्या विक्रीतून सेनॉन कुटुंबाला सुमारे 107 टक्के भांडवली नफा मिळाला आहे.
मालमत्ता नोंदणीसंबंधी उपलब्ध माहितीनुसार, हे चारही फ्लॅट्स चित्रपट निर्माता आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी खरेदी केले आहेत. या व्यवहारांची नोंदणी 24 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. सेनॉन कुटुंबाने 2013 ते 2017 या कालावधीत हे चार फ्लॅट्स एकूण सुमारे 4.31 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता त्यांची विक्री 8.9 कोटी रुपयांना झाल्याने कुटुंबाला जवळपास 4.6 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जवळपास नऊ ते तेरा वर्षांच्या कालावधीत ही गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढली.
अंधेरी पश्चिमेतील 'रहेजा क्लासिक' या निवासी संकुलातील दोन मोठे फ्लॅट प्रत्येकी 3.23 कोटी रुपयांना विकण्यात आले. या फ्लॅट्सचे बांधकाम क्षेत्रफळ 654.23 चौरस फूट असून प्रत्येक फ्लॅटसोबत एक कार पार्किंगची सुविधा आहे. या व्यवहारांवर प्रत्येकी 19.41 लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले गेले.
याच इमारतीतील उर्वरित दोन लहान फ्लॅट्स प्रत्येकी 1.21 कोटी रुपयांना विकले गेले. या फ्लॅट्सचे बांधकाम क्षेत्रफळ 246.06 चौरस फूट आहे. प्रत्येक व्यवहारावर 7.29 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गीता सेनॉन यांनी जुलै 2013 मध्ये दोन मोठे फ्लॅट्स एकूण 1.40 कोटी रुपयांना खरेदी करून या गुंतवणुकीची सुरुवात केली होती. त्यानंतर जून 2017 मध्ये कृती आणि नुपूर यांनी आणखी दोन फ्लॅट्स मिळून 2.90 कोटी रुपयांना खरेदी केले. अशाप्रकारे कुटुंबाने चारही फ्लॅट्ससाठी एकूण 4.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
दरम्यान, क्रिती सेनॉन लवकरच 'कॉकटेल 2' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॉकटेल'चा सिक्वेल आहे.