

कुठलीही नाती आधी अगदी सहज मैत्रीच्या चौकटीत येतात, पण हळूहळू ती कधी त्या चौकटीच्या पलीकडे जातात हे समजणेच कठीण होऊन जातं. या अशाच सुंदर पण तितक्याच मनाला भुरळ पाडणाऱ्या भावनिक गुंत्यावर भाष्य करणारा मराठी चित्रपट ‘मैत्रेया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या प्रमुख हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सोहळ्याला समीर वानखेडे, सुदेश भोसले आणि उर्मिला कानेटकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
काय आहे ‘मैत्रेया’ची गोष्ट?
जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या विश्वात फिरणारी ही कथा आहे. यांच्यातील घट्ट मैत्री, वाढणारी जवळीक, प्रेमाची चाहूल आणि या सगळ्यामुळे मनात निर्माण होणारा संभ्रम ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणवतो. मैत्री आणि प्रेमाच्या या खेळात या चौघांच्या आयुष्यात नेमकं काय वळण येणार? काही नाती अशीच अपूर्ण राहणार का? या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत. या चित्रपटातील गाणी आधीच लोकांच्या पसंतीस उतरली असून संगीतप्रेमींकडून त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
काय म्हणतात निर्माते-दिग्दर्शक?
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणाली, मैत्री आणि प्रेम या दोन्ही भावना अतिशय सुंदर पण गुंतगुंतीच्या आहेत. आपल्या मनात चाललेला हाच संभ्रम आम्ही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चौघांच्या प्रवासात प्रेक्षकांना कुठेतरी स्वतःचीच कथा पाहायला मिळेल.
निर्माते मनोज खळतकर म्हणाले, तरुणाईच्या नात्यांमधील तो सहजपणा आणि भावनिक चढ-उतार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील. हा चित्रपट तरुण पिढीसोबतच संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
समर टाईम्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट क्रांती रेडकरने दिग्दर्शित केलाय. मनोज खळतकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. यात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका असून, येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होत आहे.