

पुढारी ऑनलाईन डेस्क : पडद्यावरील अभिनयच नाही तर खूप परखड आणि स्पष्ट मत मांडणारा अभिनेता म्हणून किरण माने यांची ओळख आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण माने यांनी आपले मत मांडले आहे. आज २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिवस. त्याच औचित्याने अभिनेता किरण माने यांनी फेसबूकवर फोटो पोस्ट केली आहे. किरण माने यांनी नरेंद्र दाभोळकर यांचा एक फोटो पोस्ट केला असून मोठी पोस्ट लिहिलीय.
"छे छे...अरे किरण, मित्रा दोन हजार चोवीस साल आहे हे. आता कुठं राहिलीय बुवाबाजी? हवेतून अंगारा काढणं वगैरे थोतांड आहे हे कळलंय लोकांना. लोक हुशार झालेत. विज्ञान वगैरे शिकलेत. ते अशा गोष्टींना भुलत नाहीत." तर्जनीतल्या अंगठीशी चाळा करत एक अभिनेता मित्र म्हणाला.
...मी विषय बदलत त्याला विचारलं, "तुझ्या अंगठीत खडा आहे तो माणिक आहे का?" तो खळखळून हसला. "पुष्कराज आहे." असं म्हणत त्यानं तो खडा कपाळाला लावला, "को ऊं बृं बृहस्पती नमः" असं कायतरी पुटपुटला आणि म्हणाला, "गुरूजींनी घालायला सांगीतला. मनासारखं कामच मिळत नाही रे. पैसा मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही. पुष्कराजमुळे फरक पडेल असं म्हणालेत गुरूजी. जरा ओढाताण करून वडिलांच्या पेन्शनचे पैसे उसने घेऊन घेतली अंगठी. बघू." पुन्हा तो खडा त्यानं कपाळाला लावला.
मला काय बोलावं हेच कळेना... "हीच ती बुवाबाजी." असं त्याला सांगावं वाटलं. आपल्या अख्ख्या लाईफची सगळी झंझट मिटवायला आपलं कर्तृत्त्व नाही, तर एखाद्या ज्योतिषानं चमत्कार करावा असं वाटणंच बुवाबाजीला जन्म देतं भावांनो. कुणीतरी बुवाबापू जादूची पोतडी घेऊन येईल आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स मिटतील, या आशेपोटी माणूस कशावरही विश्वास ठेवायला लागलाय...
"रोज चमचाभर शेण खा तुम्हाला मुलगा होईल." ठेवला विश्वास. "रोज गोमुत्र प्या कॅन्सर होणार नाही." ठेवला विश्वास. "अमकीकडं गुप्त खजिना आहे. पाच लाख रूपये खर्चून विधी करावा लागेल." ठेवला विश्वास.
लोक रहात्या घराची भिताडं पाडून किचन हिकडं आन् पलंग तिकडं करायला लागलीत. कमोडवर बसल्यावर आपलं तोंड कुठल्या दिशेला पाहिजे हे बी गुर्जी सांगायला लागलेत.
सगळं कुठपर्यन्त पोहोचतं माहीतीये?
"ही क्रिम वापरा, सात दिवसात गोरा रंग !"
"हा साबण वापरून अंग धुवा, दिवसभर फ्रेश !"
...आरं भावा, कुठलाबी परफ्युम अंगावर फसाफसा मारल्यावर पोरी तुझ्यामागं दणादणा पळायला आयाभैनी उघड्यावर पडल्यात का??
मला सांगा, दोन हजार चोवीस सालीबी असल्या खोट्या स्वप्नांना भुलणारी माणसं आहेत की नाहीत??? म्हणजेच इथं अंधश्रद्धा आहे. विज्ञानानं दिलेल्या मोबाईलपासून चष्म्यापर्यन्त सगळं रोज आपण वापरतो... पण दिवसेंदिवस तर्कशुद्ध आणि विवेकी विचारांपासून आपला मेंदू कित्येक मैल दूर चालला आहे.
आज डाॅ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन. आपला समाज या अशा फसवणुकीतनं बाहेर पडावा. समाजात विज्ञानदृष्टी यावी, विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, यासाठी दाभोलकरांनी प्राणांची आहुती दिली...
आवो, समाजाला कर्मकांडातनं, अंधश्रद्धेतनं बाहेर काढू पहाणार्या तुकोबारायालाबी असंच वैकुंठाला धाडलं मारेकऱ्यांनी...जाता-जाता तुका कळकळीनं सांगून गेला :
"आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करू नाश आयुष्याचा !
सकळांच्या पाया माझे दंडवत.. आपुलाले चित्त शुद्ध करा !!
तुका म्हणे हित होय तो व्यापार.. करा, फार काय शिकवावे ???"
नरेंद्रकाका, विनम्र अभिवादन. विवेकाचा आवाज बुलंद करू.
- किरण माने.
किरणा मानेंच्या पोस्टवर काय म्हणाले नेटकरी?
किरण माने यांच्या फेसबूक पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टबद्दल नेटकऱ्यांनी सोशल मीडिया कॉमेंट् बॉक्समध्ये प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिलंय- ''खूप मार्मिक, समर्पक, परखड, तर्कशुद्ध लिहितात तुम्ही, पडद्यावर ही तुमचा अभिनय विलक्षण असतो. तुम्ही खूप चांगले काम करत आहात सर, दाभोलकरांना लोक विसरत चालले आहेत, बुवा बाजी, ज्योतिष, पाखंड, कर्मकांड उघड उघड होत आहे. आपण समाज प्रबोधनाचं खूप महान काम करत आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.'' दुसऱ्या युजरने लिहिलंय-विज्ञाना कडून आपण सृष्टी घेतली पण विज्ञान दृष्टी घेणे राहिलेच ..आणखी एकाने लिहिलं- ''माणूस मरतो विचार मात्र अमर राहतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना विनम्र अभिवादन.'' रोखठोक विचार मांडलेत दादा.. असे म्हणत नेटकऱ्यांनी दाभोळकरांना विनम्र अभिवादन केले आहे.