पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठी अभिनेते किरण माने यांनी कोल्हापुरात अभिवाचन केले. त्यांनी मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर त्यांनी फेसबूक आणि इन्स्टावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. सोबतच एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये किरण माने अभिवाचन करताना दिसताहेत.
आपण रंगभुमीवर आहे... आपल्यावर स्पाॅटलाईट आहे... आपल्या मातीतलं जगणं ज्यानं साहित्यात अजरामर करून ठेवलं अशा आपल्या अत्यंत आवडत्या लेखकाचे शब्द आपण साभिनय वाचून दाखवतोय... प्रेक्षक जीवाचा कान करून ऐकतायत... खळखळून हसतायत... टाळ्यांचा कडकडाट करतायत... बास. अजून काय पाहिजे? सुख वो सुख !
मायणीसारख्या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालो. कथा वाचायची गोडी लागली ती शंकर पाटील या कलंदर लेखकामुळं ! त्यांच्या कथेत माझं 'वळखीचं', काळजात जपलेलं सगळं मला दिसायला लागायचं. आजबी त्यांचं कुठलंबी पुस्तक उघडलं की मला माझ्या मातीचा गंध यायला लागतो... वाचता वाचता माझं मन शेतात जातं, नदीत सूर मारून येतं, उगं येड्यागत वढ्या-वघळीतनं पांदीतनं फिरतं, 'शंभोSSS' असा गाभार्यात आवाज घुमवत शंकराच्या देवळातली घंटा वाजवतं, गांवातल्या पारावर जाऊन बसतं, चावडीवर घुटमळतं... गांवातले एकसो एक जबराट, भन्नाट, खतरनाक इरसाल नमुने मला भेटतात ! आमची अस्सल बोली - एका चढ एक शेलके शब्द आणि तेवढ्याच वृत्ती-प्रवृत्ती, संघर्ष, झगडे, खोड्या, लफडी-कुलंगडी... नुस्ती धुमडी चालती वो मनामेंदूत !
लहानपणीच माझ्या मनातल्या गावाची 'पाटीलकी' मी या लेखकाला बहाल केली ! पुर्वी गांवच्या पाटलाच्या हातात पानाची चंची असायची. तिला लै कप्पे असायचे. गप्पा मारत-मारत तो पाटील वेगवेगळ्या कप्यांमधनं सुपारी-चुना-कातबित काढून, मन लावून आपला विडा रंगवायचा... तसं आपल्या साहित्यविश्वातल्या या 'पाटला'नं, गावरान जगण्याच्या एकेका कप्प्यातनं इरसाल किस्से आणि नमुने गोळा करून आपल्या प्रत्येक कथेचा 'विडा' अस्सा नादखुळा रंगवलाय की वाचणार्याचं आणि ऐकणार्याचं भान हरपून जातं.
शंकर पाटलांच्या 'जुगलबंदी' या अस्सल गावठी तडका असलेल्या कथेचं अभिवाचन काल मी कोल्हापुरात केलं. प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला आलेल्या एका अंध बांधवाच्या प्रतिक्रियेचा मेसेज कमेन्टबाॅक्समध्ये देतो. विशेष म्हणजे कार्यक्रमाला तरूण पोरापोरींची उपस्थिती बघून भारावलो. शंकर पाटील पुढच्या पिढ्यांनी वाचले तरच हरवत चाललेलं माझं जुनं गांव कुठंतरी जपलं जाईल अशी आशा वाटते...
- किरण माने