

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडामध्ये असलेल्या त्यांच्या कॅफेवर गोळीबार झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डी याने स्वीकारली आहे. अलीकडेच कपिल शर्मा आणि त्यांची पत्नी गिन्नी यांनी या कॅफेचे उद्घाटन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रात्रीच्या वेळी गाडीत बसून कॅफेच्या खिडक्यांवर अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी किमान 9 फैरी झाडल्या. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आता या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने दावा केला आहे की, हा गोळीबार त्यानेच घडवून आणला आहे.
मात्र, कपिल शर्माच्या कॅफेला नेमके का लक्ष्य करण्यात आले, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याचबरोबर, कपिल शर्मा याच्याकडूनही या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडातील सरे येथे त्याच्या या कॅफेचे उद्घाटन झाले होते. त्याने पत्नी गिन्नी चतरथ यांच्यासोबत मिळून हे भव्य रेस्टॉरंट सुरू केले असून, त्याचे नाव 'कॅप्स कॅफे' असे ठेवण्यात आले आहे.