

पुढारी ऑनलाईन डेस्क - हंगामा ओटीटी १९ मार्च २०२५ रोजी आणखी एक बहुप्रतीक्षित वेबसीरीज घेऊन आली आहे. "खदान" हंगामा ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. यात अली गोनीसह करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद मुख्य भूमिकेत झळकतायेत. हंगामा ओटीटीवर प्रसारित झालेली ही मालिका एक रोमांचक थ्रिलर दिसते जी सस्पेन्स आणि अॅक्शन यांचं मिश्रण आहे.
भयानक भूतकाळाने पछाडलेल्या खाण गावात इन्स्पेक्टर वीर प्रताप सिंग (अली गोनी) शांततेच्या शोधात येतो, पण इथे येऊन तो एका वेगळ्याच पेचात फसला जातो. गावात एका संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या झाल्याचे आढळून येते, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या हत्येचा सूड घेण्यासाठी आत्मा परत आली आहे का? गावाला दीर्घकाळापासून असलेला शाप पुन्हा लागला आहे का? तपासादरम्यान सापडलेल्या शेकडो मृतदेहांमागे कोण आहे? वीर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोध असताना, तोच रहस्य आणि फसवणुकीच्या जाळ्यात खोलवर ओढला जातो. प्रत्येक रहस्य उलगडताना दंतकथा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट होत जातात, ज्यामुळे एक सत्य समोर येते जे त्याच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेते आणि ज्यामुळे त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलतो.
अली गोनीने अनुभव सांगितला. तो म्हणाला, “खदानमध्ये वीर प्रताप सिंगची भूमिका साकारणे खरोखरच खास आणि माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या भूमिकेमुळे मी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हॉरर-थ्रिलर शैलीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधीही साकारली नव्हती. ही सीरीज खरोखरच आकर्षक आहे. मला पटकथा वाचण्यापासून ते शूटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खूप आवडली. ही, कथा नक्कीच गुंतवून ठेवणारी असून मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल”.
आपल्या खदानमधील भूमिकेबद्दल बोलताना करणवीर बोहरा म्हणाला, अशा प्रकारची भूमिका पडद्यावर साकारणे खरंच आव्हानात्मक असते, आणि मला ते आवडते. खदानमध्ये एका कथेत अनेक परस्पर कथा विणलेल्या आहेत. प्रत्येकाचा स्वत:चा संघर्ष आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव आहेत. प्रत्येक पात्र या प्रवासात स्वतःचे सत्य शोधण्यासाठी त्यांच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करतात हे पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता आणि मला आशा आहे की प्रेक्षक आम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक करतील."
प्रज्ञाची भूमिका साकारणारी रेबेका आनंद म्हणाली, "खदान कपट याने भरलेला एक चक्रव्यूह आहे, यात भूतकाळातील न सुटलेले संघर्ष आहेत. वीर आणि प्रज्ञा हे रहस्यमय गाव उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. वेबसीरीज जस जशी पुढे जाईल तशी प्रेक्षकांना एका रंजक वळणावर प्रज्ञाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना ते नक्कीच खिळवून ठेवतील.”