

Sanjay Kapoor passes away
पुढारी आनलाईन डेस्क : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे गुरूवारी (दि.१२) रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी X वर संजय कपूर यांच्या निधनाबाबत दुजोरा देत शोक व्यक्त केला. पोलो खेळत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत त्यांनी काही तासांपूर्वी ट्विट करत मृतांबाबत संवेदना वाहिली होती.
एका वृत्तानुसार, संजय कपूर यांना पोलो खेळण्याची आवड होती. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो कल्बमध्ये गुरूवारी (दि.१२) रात्री ते पोलो खेळत होते. यादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जमीनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने २००३ मध्ये उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते टिकले नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना समायरा आणि कियान अशी दोन मुले असून ती करिश्मासोबतच राहतात. संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर करिश्माने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 'संजय व त्यांची आई तिला खूप त्रास देत होती, असे म्हणत तिने माध्यमांसमोर आपल्या वैवाहिक आयुष्यातील अनेक खुलासे केले होते. संजयने आपल्याला मारहाण केल्याचेही तिने माध्यमांना सांगितले होते. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केले.