

'Sorry Not Prada... But My OG Kolhapuri': Kareena Kapoor Shows Prada 'Kolhapuri'
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान हीने एक्सवर एक फोटो पोस्ट करत प्राडा या इटालीयन कंपनीला टोमणा हाणला आहे. मध्यंतरी प्राडा लक्झरी ब्रँडने कोल्हापूरी चप्पलची कॉपी करत आपले एक फूटवेअर फॅशन शोमध्ये प्रदर्शित केले हाते. यावेळी त्यांनी या चप्पलचे श्रेय कोणालाही दिले नव्हते यावर जगभरातून चांगलीच टीका झाली होती.
या मुद्याचा आधार घेत करीनाने एक कोल्हापूरी चप्पल घातलेला फोटो पोस्ट केला आहे. यावर तिने ‘सॉरी नॉट प्राडा... बट माय ओजी कोल्हापूरी’ (Sorry not PRADA.....but my OG kolhapuri) अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाही पण मात्र तिने परिधान कलेले स्टायलिश कोल्हापूरी चप्पल दिसतात.
प्राडा त्यांच्या स्प्रिंग 2026 मेन्सवेअर कलेक्शनमध्ये मिलान फॅशन वीक दरम्यान 'टो रिंग सँडल्स' नावाने एक फुटवेअर सादर केलं. हे सँडल्स भारताच्या पारंपरिक कोल्हापूरी चप्पलांशी खूपच साम्य दिसत असल्याने वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, प्राडाने सुरुवातीला या डिझाइनला भारतीय कलाकारांकडून प्रेरीत असल्याचं नमूद केलं नव्हतं. यामुळे कोल्हापूर व भारतातून थेट टीका प्राडा या कंपनीवर झाली होती. या सँडल्सची किंमत जवळपास 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली होती, ज्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला. कोल्हापूरी चप्पलला जीआय मानांकन मिळालेले आहे तसेच भारतीय कलेचा हा शतकानुशताकांचा वारसा आहे पण प्राडा कंपनीमुळे या कलेचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली होती.
चहूबाजूनी टीका झाल्यानंतर ‘प्राडा’ ने कबूल केले की त्यांच्या मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेली चप्पल ही पारंपरिक भारतीय कारागिरीचा वारसा सांगणारी ‘कोल्हापुरी चप्पल’ आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या हस्तक्षेपानंतर ‘प्राडा’ ग्रुपने ही भूमिका जाहीर केली. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ‘प्राडा’चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबात वस्तुस्थिती मांडली होती.
करिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, अनेकांनी तिच्या या मजेदार टिप्पणीचं कौतुक केलं आहे. तिच्या पोस्टमुळे कोल्हापूरी चप्पलांच्या सांस्कृतिक महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. ‘प्राडा’ विरोधात यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्राडाने कोल्हापूरी चप्पलांचं डिझाइन कॉपी केल्याचा आरोप आहे. याचिकेत प्राडाने माफी आणि कोल्हापूरच्या कारागिरांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापुरी चप्पलचे श्रेय नाकारणार्या ‘प्राडा’ कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनीही लावून धरली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती.