

धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला धडक 2 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. खरं तर हा सिनेमा नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीज होणार होता. पण या सिनेमाला सेन्सॉरची मान्यता मिळण्याठी झालेला उशीर या सिनेमाचा रिलीज पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरला. तृप्ती डीमरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शाजिया इकबाल यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. आता हा सिनेमा 1 ऑगस्ट 2025 ला रिलीज होणार आहे.
जात आणि सामाजिक भेदभाव आणि प्रेमकहाणी यावर बेतलेला हा सिनेमा काहीसा संवेदनशील होत जातो.
दलित मुलगा आणि सवर्ण मुलगी यांच्यातील प्रेमकहाणी हा या सिनेमाचा विषय आहे. अर्थात या सिनेमाला इतर कंगोरेही आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचमध्ये करणने रिलीजला उशीर होण्याचे कारण सांगितले. करण म्हणतो, ‘ धर्मा प्रॉडक्शन आजवर ग्लॅमरस आणि फील गुड सिनेमांसाठी ओळखला जातो. त्यांनी पहिल्यांदाच विचारपूर्वक वेगळा सिनेमा आणण्याचे ठरवले आहे. या विषयाच्या संवेदनशिलतेला कुठेही धक्का लागणार याची काळजी घेऊनच हा सिनेमा बनवला आहे.
आम्हाला सिनेमा हॉलपर्यंत पोहोचायला वेळ लागला हे खरे आहे. पण सेन्सॉर बोर्डनेही सौजन्य दाखवत सिनेमातून आम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घेतले. याचबरोबर सिनेमाशी निगडीत त्यांची भूमिका समजून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला.
या सगळ्यांमध्ये वेळ लागला पण चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतोच. हा सिनेमाही आमच्यासाठी अशीच चांगली गोष्ट आहे. जी तुम्हाला जागे करेल आणि विचार करायला भाग पाडेल. ही केवळ लहान शहराची गोष्ट नाही तर अगदी आपल्या आसपासही अशाच घटना घडत असतात. हे एक सत्य आहे. वेळ लागला तरी आम्ही ही कथा आम्हाला हवी तशी प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकलो याचा आनंद आहे.’
कारण 2018 मध्येही धडक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. यामध्ये इशान खट्टर आणि जान्हवी कपूर होते. जान्हवीसाठी हा सिनेमा महत्त्वाचा होता. हा तिचा डेब्यू सिनेमा होता. मूळ सैराटचा रिमेक असलेल्या धडकची पार्श्वभूमी राज्यस्थानची होती.