

kangana ranaut slams kriti sanon ad as creepy ask why tie rakhi in bikini
पुढारी ऑनलाईन : कंगना रनौत अनेकदा विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसते. आता कंगनाने कृति सेननच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली असून, अभिनेत्रीच्या आउटफिटवरही टोला लगावला आहे.
कृति सेननने नुकतीच एका जाहिरातीत काम केले आहे. या जाहिरातीत ती ब्रालेट-स्टाइल ब्लाउजमध्ये दिसत असून, आपल्या भावाला राखी बांधताना दिसते. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने प्रश्न केला की, “तुम्ही तुमच्या भावाला बिकिनीमध्ये राखी बांधता का?”
कंगना म्हणाली, अंडरगारमेंट्समध्ये राखी का बांधायची?
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हा सवाल उपस्थित केला. तिने म्हटले की, आज महिलांकडे कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कॉकटेल ड्रेसपासून महागड्या चोळीपर्यंत, जीन्सपासून साडीपर्यंत आणि बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. “एवढे पर्याय असतानाही तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंडरगारमेंट्समध्ये राखी का बांधाल? तुमचे सर्व स्टायलिंग पर्याय कुठे गेले? ही जाहिरात खूपच विचित्र वाटत आहे,” असा टोला कंगनाने लगावला.
जाहिरातीवरून वाद
रक्षाबंधनाचा सण २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ही जाहिरात समोर आली आहे. जाहिरातीत कृति सेननने ब्रालेट-स्टाइल ब्लाउज आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला आहे. या पोशाखात ती रक्षाबंधन साजरे करताना दिसते.
या जाहिरातीवरून सोशल मीडियावरही मोठा वाद निर्माण झाला आहे. काही यूजर्सनी पारंपरिक पोशाखाऐवजी अशा प्रकारचा आउटफिट रक्षाबंधनासारख्या सणासाठी वापरणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर यूजर्सच्या प्रतिक्रिया
एका यूजरने ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कृति सेननने भावाला राखी बांधताना ब्रासारखा दिसणारा पोशाख परिधान केला आहे. आणखी एका यूजरने जाहिरातीवर नाराजी व्यक्त करत हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले. काही यूजर्सनी असा आरोपही केला की, हिंदू सणांनाच अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी लक्ष्य केले जाते.
कृति आणि कंगनाची प्रोफेशनल लाइफ
कृति सेनन नुकतीच ‘कॉकटेल 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका आणि लूकही बोल्ड असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
दुसरीकडे, कंगना रनौत शेवटची ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने नर्सची भूमिका साकारली आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुग्णालयातील रुग्ण आणि इतर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.