

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jacqueline Fernandez : बॉलीवूड इंडस्ट्री अजूनही ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाच्या दु:खातून सावरलेली नाही, की आता आणखी एका वाईट बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला शोकाकुल केलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई, किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. 6 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किम फर्नांडिस काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटकाही आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. अखेर, 6 एप्रिल रोजी किम यांनी जगाचा निरोप घेतला.
या दुःखद प्रसंगामुळे जॅकलीन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. जॅकलीनच्या चाहत्यांना आशा होती की तिची आई आजारावर मात करेल आणि लवकर बरी होऊन घरी परतेल. मात्र आज ही दुःखद बातमी समोर आली, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण जॅकलीनला या कठीण प्रसंगी धीर देत आहेत आणि तिच्या आईंला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
जॅकलीनने आईच्या प्रकृतीच्या कारणामुळे IPL शी संबंधित एका कार्यक्रमातून माघार घेतली होती. गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या आधी जॅकलीनचा परफॉर्मन्स होणार होता. मात्र आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अखेर तिच्या जागी सारा अली खानने नृत्य सादरीकरण केले.