

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता सनी देओल - रणदीप हुडा स्टारर 'जाट' बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरु असताना दुसरीकडे मात्र वाद निर्माण झाला आहे. एका सीनमुळे या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. या चित्रपटाला पंजाबमध्ये खूप विरोध होत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआरची मागणी होत आहे. 'जाट' १० एप्रिलला सिनेमागृहात रिलीज झाला होता. पण आता या चित्रपटातील एका सीनवर वाद झाला आहे. जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे?
सनी देओल स्टारर 'जाट'मध्ये एका चर्चचे सीन आहे, ज्यामुळे ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्याचे वृत्त समोर आले आहे. 'जाट'मध्ये एक सीन आक्षेपार्ह असल्याचे ख्रिश्चन समुदायाने म्हटले आहे. त्याचबरोबर, निर्मात्यांना अल्टीमेटम दिलं आहे की, त्यांनी या प्रकरणावर दोन दिवसात निर्णय घेतला नाही, तीव्र विरोध केला जाईल. शिवाय 'जाट' चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय. ख्रिश्चन समुदायाने जालंधरच्या जॉईंट पोलिस कमिश्नरना लेखी तक्रार देखील दिलीय. यामध्ये 'जाट' चित्रपट थांबवण्याची मागणी करण्यात आलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, ख्रिश्चन समुदायाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे- रणदीप हुडाने येशु मसीह आणि आमच्या धर्मात वापरण्यात येणारे पुलपिट (चर्चमध्ये उपदेशक किंवा पादरी भाषण देतात तो मंच वा डेस्क) सारख्या धार्मिक वस्तूंचा गैरवापर केला आहे. चित्रपटाच्या सीनमध्ये रणदीप चर्चच्या आता उभा असलेला दिसत आहे आणि रक्तपात घडवून आणताना दिसत आहे. दुसरीकडे चर्चमध्ये ख्रिश्चन समुदायाचे लोक प्रार्थना करत आहेत, पण तिथे रणदीप हुडा येशु मसीह प्रमाणे उभा राहतो आणि म्हणतो की, त्याला येशु मसीहने पाठवलं आहे. रणदीप गुंडांना धमकावत आहे. तो आधी म्हणतो की, तुमचा प्रभु येशु मसीह झोपला आहे आणि त्याने मला पाठवलं आहे. त्यानंतर रणदीप हुडा सर्वांना गोळ्या मारणे सुरू करतो.