

Imran Khan India Leave Notice: अभिनेता इमरान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस बजावली असून, त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अभिनेता इमरान खान सहभागी झाले होते. यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले होते.
इमरान खान यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नसून, ते अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यामुळे राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात इमिग्रेशन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे मनोरंजन क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
इमरान खान यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९८३ रोजी अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन येथे झाला. त्यांच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट असून, भारताचे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डही आहे.
मात्र, OCI कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नव्हे. हे कार्ड असलेल्या व्यक्तींना भारतात राहण्यासह काही सुविधा मिळतात; परंतु भारतीय नागरिकांना असलेले सर्व अधिकार त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे इमरान खान यांच्या आंदोलनातील सहभागावरून त्यांच्या नागरिकत्वाचा आणि भारतात राहण्याच्या परवानगीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही इमरान खान यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. भारतीय नागरिक नसताना देशातील राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस बजावल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पुढे काय घडते आणि इमरान खान यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.