पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि आदित्य चोप्रा (Yash Raj Films) यांनी एकत्र येऊन क्रिश ४ (Krrish 4) ची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) करणार आहे. राकेश रोशन यांनी याआधी जाहीर केले होते की ते क्रिश ४ चे दिग्दर्शन करणार नाहीत.
रोशन यांनी शुक्रवारी हृतिकसाठी एक पोस्ट X वर शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले आहे की ते त्यांच्या मुलाकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवत आहेत. २५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्याला दिग्दर्शक म्हणून "री-लाँचिंग" करत आहोत. या पोस्टवरील कॅप्शनमध्ये नमूद केले आहे, "डूग्गू २५ वर्षांपूर्वी मी तुला अभिनेता म्हणून लाँच केले होते आणि आज पुन्हा २५ वर्षांनंतर मी तुला आदित्य चोप्रा आणि मी स्वतः या दोन चित्रपट निर्मांत्यांकडून दिग्दर्शक म्हणून लाँच करत आहोत. जेणेकरून आम्हाला आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट #Krrish4 साकारता येईल. या नवीन भूमिकेसाठी तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद."
'क्रिश' ही देशातील सर्वात मोठी सुपरहिरो फ्रँचायझी म्हणून ओळखली जाते. याची सुरुवात २००३ मध्ये 'कोई मिल गया'ने झाली. त्यानंतर २००६ मध्ये 'क्रिश' आला. २०१३ मध्ये 'क्रिश ३' रिलीज झाला. प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट होता. त्यात विवेक ओबेरॉयने खलनायकाची भूमिका केली होती. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरले.
रिपोर्टनुसार, 'क्रिश ४' ची पटकथा तयार आहे. त्याचे प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू आहे. हा चित्रपट २०२६ च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.