

पुढारी ऑनलाईन डेस्क: जागतिक स्तरावर प्रशंसा मिळालेला 'संतोष' हा हिंदी चित्रपट गतवर्षी ब्रिटनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटाला युनायटेड किंग्डमने त्यांची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून निवडले होते.
तथापि, हा चित्रपट भारतात मात्र सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडला आहे. भारतीय सेन्सॉर बोर्डच्या (CBFC) च्या प्रमाणपत्राच्या अडचणींमुळे भारतात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
ब्रिटिश-भारतीय दिग्दर्शिका संध्या सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी यापुर्वी I For India आणि Around India with a Movie Camera या माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे.
'संतोष' हा उत्तर भारतातील पोलिस तपास प्रक्रियेवर आधारित थरारपट आहे. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांच्या सहनिर्मितीमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचे कथानक एका विधवेभोवती फिरते. जिला तिच्या मृत पतीच्या पोलिस हवालदार पदाची जबाबदारी मिळते.
तिच्या वरिष्ठ निरीक्षकासोबत ती एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या हायप्रोफाईल केसच्या चौकशीत गुंतली जाते, असे याचे कथानक आहे. या चित्रपटात शहाणा गोस्वामी आणि सुनीता राजवार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून, तो 10 जानेवारीला भारतात प्रदर्शित होणार होता.
कान्स फेस्टिव्हलमध्ये झाला होता प्रीमियर
गेल्या वर्षी मे महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Un Certain Regard विभागात या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. भारतात तो मुंबई MAMI फिल्म फेस्टिव्हल आणि धर्मशाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता.
हा चित्रपट यूकेकडून ऑस्कर प्रवेशासाठी निवडला गेला होता, परंतु अंतिम पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. भारतात संतोष या चित्रपटाचे वितरण PVR Inox Pictures हाताळत आहे.
ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियन ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शिका संध्या सूरी यांनी म्हटले आहे की, भारतीय सेन्सॉर बोर्डाने इतके मोठे आणि मूलभूत बदल सुचवले की ते करणे अशक्य होते. काही बदल इतके व्यापक होते की त्यांची यादी अनेक पानांवर होती. त्यात पोलिस वर्तणुकीसंदर्भातील मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले गेले होते.
माझ्यासाठी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणे अत्यंत महत्त्वाचे होते, म्हणून मी त्यासाठी मार्ग शोधायचा प्रयत्न केला. परंतु हे बदल करणे इतके कठीण ठरले की त्यामुळे चित्रपटाचा अर्थच बदलेल आणि त्याच्या मूळ दृष्टीकोनाशी प्रतारणा झाली असती.
भारतीय पोलिस यंत्रणेबाबतचा हा चित्रपट आहे. फ्रान्समध्ये याला सिनेमागृहांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. मी हा चित्रपट केवळ परदेशी प्रेक्षकांसाठी बनवला नाही, असेही संध्या सुरी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटल्या होत्या.
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री शहाना गोस्वामी म्हणाली की, सेन्सॉरने सांगितलेले बदल आम्ही स्वीकारू शकत नाही, कारण त्यामुळे चित्रपटाचे मूळ स्वरूप बदलून जाईल. कोणीही हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ नये असे म्हणत नाही, पण सध्या परिस्थिती अशीच आहे.
याचा खेद वाटतो. हा चित्रपट कोणत्याही व्यक्ती किंवा समूहावर टीका करत नाही, तो समाजातील वास्तव दर्शवतो. या चित्रपटामुळे कोणतीही अडचण निर्माण व्हायला नको.
CBFC सदस्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मात्र चित्रपटाच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. "मला कट सूचीबद्दल माहिती नाही. मी कोणत्याही सर्जनशील कलाकृतीवर बंदी घालण्याच्या विरोधात आहे. माझे स्वतःचे चित्रपट रद्द केले आहेत.
मला संतोष हा चित्रपट पाहायची इच्छा आहे. तो ब्रिटनचा अधिकृत ऑस्कर प्रवेश आहे. मग तो भारतात का रोखला जात आहे हे मला माहित नाही. CBFC ला कोणतीही गोष्ट बॅन करण्याचा अधिकार नाही; ते फक्त सूचना देऊ शकतात.